आता मुक्काम केंद्रिय शाळा हातगांव

मी सुधारित आदेशाप्रमाणे पंचायत समिति ,मुर्तिजापूर कार्यलयांत माननीय संवर्ग विकास अधिकारी , सहाय्यक ऊपशिक्षणाधिकारी श्री. खानझोडेसाहेबांना भेटलो .त्यांच्या लेखी निर्देशाप्रमाणे ४ किलोमीटर अंतरावरील हातगांव शाळेवर मुख्याध्यापकांना भेटलो .ह्यावेळेपावेतो दुपारचे ५.३० वाजून गेले होते .तेथील मुख्याध्यापक आरखेडकरांना ऊद्या शुक्रवारी कार्यमुक्त करतो मी आजपासूनच कार्यभार घेईन असे सांगून अकोल्याला परत आलो . हातगांवला शुक्रवारी मुर्तिजापूर बाजारचा दिवस असल्याने सकाळची शाळा होती . त्याप्रमाणे मी सकाळीच ७ वाजता शाळ्वर हजर झालो . जुन्या आदेशाप्रमाणे दुसरे गुरूजीही केंद्रिय शाळा मुख्याध्यपकाचा कार्यभार घेण्यासाठी कालच हजर झाले होते . ते गुरूजीसुध्दा हजर झाले .श्री . आरखेडकर गूरूजीही आले . तेव्हड्यात मुर्तिजापूरहून श्री . खानझोडेसाह्बही शाळेला भेट देण्यासाठी आले . त्या दिवशी शाळेवर ३ मुख्याध्यापक हजर होते .
श्री .खानझोडे साहेबांनी आम्हा तिघांनाही प्रश्न विचारला . आज आता नवीन केंद्रिय शाळा मुख्याध्यापकाचा कार्यभार तुमच्या तिघांपैकी कोण घेणार आहे ? श्री . आरखेडकर गुरूजी तर पदवीधारक नाहीत , ऊरले तुम्ही दोघे ! मी बोललो, ‘ सर आपण वरिष्ठ अधिकारी आहात ,आपला निर्णय आम्ही मान्य करू .’ श्री. खानझोडे साहेबांनी विचारले ,कोणाचा आदेश Latest आहे , दाखवा बघु मला , आता .हा श्री .लोणकर गुरूजींचा सुधारित आदेश Latest आहे .त्यामुळे केन्दिय शाळा हातगांवच्या मुख्याध्यापकाचा कार्यभार तेच स्विकारतील आणि ईतर दोघांनाही त्वरीत कार्यमुक्त करतील .
त्याप्रमाणे मी हातगांव शाळेच्या सर्व १८ शिक्षकांना बाजूच्या खोलीत एकत्र बोलाविले , दोघांचे कार्यमुक्त अहवाल तयार करण्याचे काम श्री .ठाकरे गुरूजींना सांगितले . ईतरांना शाळेच्या स्टॉकबुकाची अनुक्रमणिका प्रमाणे , उदा . लाकडी फर्निचर , सायंसची उपकरणे , वाचनालयील पुस्तके…….ई. ची हजर स्टॉकच्या प्रत्येकी चार प्रतित तयार करण्यास सांगितले . सातव्या वर्गातील ३ मुलांना जवळच्या स्टँडवरील हॉटेल मधून २५ चहा-पोहे आणायला सांगितले . हातगांव शाळेचा कार्यभार गेल्या २० – २२ वर्षापासून कोणीही पाहिला , दिला – घेतला नव्हता .साधारणपणे ४० मिनिटात दस्त ऐवज जसा आहे तसा सर्व कार्यभाराच्या प्रत्येेकी ४ – ४ प्रति तयार झाल्या . मी त्यावर स्वाक्षरी केली , जावक बारनिशीचा क्रमांक टाकून कार्यभार घेतल्याच्या अहवाल -प्रति
१ ) श्री .आरखेडकर गुरूजींना २ ) पं .सं .मुर्तिजापूरला ३ )शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अकोला व ४ )स्थळ प्रत तयार झाल्या . सर्वांचा चहा-नास्ता झाला.
श्री . खानझोडे साहेबांना कार्यभार घेतल्याचा अहवाल सुपूर्द केला . त्यांना खूपच आश्चर्य वाटले , आनंद वाटला . कारण कार्यभार घेणे फारच किचकट व वेळखाऊ काम असते .ते काम ईतक्या झटपट झाले होते . मी ह्याचे श्रेय माझ्या शिक्षकवर्गाला दिले . मी फक्त एवहढेच म्हणालो , सर मला मिळालेल्या वस्तुंची जबाबदारी माझी . न मिळालेल्या वस्तुबाबत नंतर यथावकाश ठरविता येईल .
नंतर मी शाळा समितिचे अध्यक्ष व सरपंच यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो . शाळा समितिचे जुने अध्यक्ष व जुने सरपंच यांनाही जाऊन भेटलो . हातगांव शाळेचे पोस्ट ऑफिसचे पासबुक नव्या सरपंच व मुख्याध्यपकांच्या नांवाने बदलून देण्यासाठी त्यांना विनंती केली . परंतु तसे सहकार्य करण्यास त्यांनी तयारी दाखविली नाही .
मी सहाय्यक उपशिक्षणाधिकारी , श्री .खानझोडे साहेबांशी विचारविनिमय केला. त्यांचे आदेशाप्रमाणे हातगांव शाळेचे पोस्टाचे पासबुक जैसे थे ! ठेवण्याचा निर्णय घेतला . शाळेतील मुलांची वर्गवार जमा केलेल्या फीसाठी वेगळ्या रजिस्टरमध्ये नोंद घेण्याची जबाबदारी श्री. ठाकरे गुरूजींकडे दिली .
हातगांवची शाळा सकाळ व दुपार अशी दुबार पध्दतिने भरविली जात असे . शाळेसाठी गावातीलच ३ – ४ जागेवरील खोल्या विनामुल्य वापरावयाला दिलेल्या होत्या . ह्याशिवाय गावाबाहेर जिल्हा परिषदेने बांधून दिलेल्या दोन पक्क्या खोल्या होत्याच . वर्ग १ ते ७ वर्गांमिळून एकूण २६५ पटसंख्या होती . शाळेत दैनंदीन उपस्थिती जेमतेम १५० असायची . शाळेतील विद्यार्थ्यांची ऊपस्थिति वाढविणेसाठीप्रथम प्रयत्न करणे आवश्यक होते . त्यासाठी
( १ )सर्व शिक्षकांची आठवड्यातून एकदा एकत्र बैठक घेण्याचे ठरविले .
( २ ) शाळा समितिचे संपूर्ण सहकार्य मिळविणेसाठी सर्वांची मासीक बैठक घेण्याचे ठरविले .
( ३ ) शाळेत सकाळी १०. ३० वाजता वर्ग १ ते ७ ची एकत्र प्रार्थना शाळेसमोर घेण्याचे ठरविले . त्यावेळी वर्गातील नियमित हजेरी शिवाय प्रार्थनेच्यावेळीच छोटी हजेरी घेण्याचे ठरविले .
( ४ )प्रार्थनेसाठी शाळेच्या समोरच्या मैदानात वर्गवार विटा जमीनीत लावल्या ,प्रथम वर्गशिक्षक , त्यांच्यासमोर वर्गप्रमुख व त्यासमोर त्या वर्गाचे विद्यार्थी उभे राहतील अशी व्यवस्था केली .
आता माझेवर केन्द्रिय शाळा मुख्याध्यापकाची जबाबदारी होती . मला माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या जबाबदारी व्यतिररिक्त १० किलोमीटर परिसरातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांच्या नियमित तपासणीचीही जबाबदारी होती .मला माझ्या शाळा तपासणी कार्यक्रमाचा तपशील , पंचायत समिति व जि .प . शिक्षणाधिकारी ह्यांचेकडे महिन्याच्या अगोदर आणि शाळा तपासणी नंतर तपासणी अहवालासह पाठवावा लागत असे .
मी माझ्या केंद्र शाळा अंतर्गत १० किलोमीटर परिसरातील सर्व शिक्षकांची एकत्रित सभा हातगांवला घेतली . नवीन घटक नियोजन म्हणजे काय ? त्याचे महत्व सगळ्यांना समजावून सांगितले . दररोज शाळेत आल्यावर वेळापत्रकाप्रमाणे कोणत्या वर्गाला कोणता भाग शिकवावयाचा आहे , ह्याचे टांचण घटक नियोजन रजिस्टरमध्ये लिहून काढावयाचे !
शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीची कारणे सांगतांना बहुतांश शिक्षकांनी आपापल्या लहान भावंडांना सांभाळण्याच्या कामामुळे मुले ,मुली शाळेत येऊ शकत नाहीत , हे कारण सांगितले . घरची गरीबी हेही एक कारण होते . ह्यासाठी गावातील शाळा समिति व्यतिरिक्त प्रतिष्ठित व्यक्तिंचे सहकार्य फार जरूरिचे होते , अत्यावश्यक होते , ह्यासाठी त्यांचीही वेगळी बैठक घेतली . सर्वांना हे पटले व त्यांनी गावकर्यांना समजाऊन सांगितले .

शुक्रवारी शाळेला चपराशी नसल्याने ,सकाळी मीच शाळेत येऊन घंटी वाजविली ,प्रार्थनेनंतर सर्व मुलामुलींना गावांत परत पाठविले आणि गावातील हजर मुला-मुलींना त्यांच्या लहान भावंडांसह शाळेत घेऊन यायला सांगितले . त्यांना पाटी-पुस्तक , लेखणी ,पेन काहिही नसले तरी चालेल . त्यांना
शाळेत गोळ्या , बिस्कीटे मिळणारआहेत असे सांगा . सगळेजण गावांत गेले अन् आपापल्या वर्गातील शाळेत न येणार्या मुलामुलींना सोबत घेऊनच शाळेत आले .मी सगळ्यांना एकत्र बसवून गोळ्या , बिस्किटे दिली . निरनिराळे खेळ खेळायला लावले . शाळा संपल्यावर सगळी मुले मुली घरी गेल्या .

प्रत्येक वर्गखोलीत सकाळी व दुपारी वर्ग भरत असूनही कोणतेही चित्रे ,म्हणी व वाकप्रचार , तक्ते काहीही लावलेले नव्हते . कोणीही शिक्षक घटक नियोजनाप्रमाणे शिकवत नव्हते . कोणीही घटक नियोजन बनविलेले नव्हते . शाळेत मुलांना बसायला तरटपाट नव्हते . मुला-मुलींना अवांतर वाचनाची आवड नसल्याने वाचनालयातील पुस्तके तशीच कपाटात पडून होती . शाळेला तारेचे कम्पांऊंड व गेटसुध्दा नव्हते . मी श्री ,खानझोडे साहेबांशी विचारविनिमय करून तसेच शाळा समितिशी चर्चा करून शाळेच्या फंडातून तसेच देणगीद्वारे जास्तीत जास्त गोष्टी कशा मिळविता येतील ह्याची योजना तयार केली . आता ठरविलेल्या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करायची होती .
(१ ) सर्वप्रथम अकोल्याला जाऊन वर्गवार प्रत्येकी एक म्हण ,एक वाकप्रचार ,तक्ता व एकेक चित्र शैक्षणिक साहित्य दुकानातून विकत आणले . प्रत्येक वर्गशिक्षकाला कार्यालयात बोलावून त्यांना त्यांच्या वर्गातील भिंतींवर लावण्यास उपरोक्त साहित्य लावावयास’दिले .सर्व भिंती मशीदीसारख्या होत्या त्या सजल्या ,नटल्या .वर्गातील मुले आनंदित झाली . आता प्रत्येक शिक्षकाने दरमहा किमान एक म्हण वा वाकप्रचार , तक्ता आणि चित्र तयार करून लावलेच पाहिजे असा नियम केला . केलेल्या खर्चाला दरमहा शाळा समितिच्या बैठकीत प्रत्यक्ष पावत्या दाखवून मंजुरात घेण्याची सवय लावून घेतली . शाळासमितिच्या बैठकीचा अहवाल लगेच पंचायत समितिच्या शिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची जबाबदारी एका शिक्षकाकडे दिली .
(२ )शाळेच्या कार्यालयात तसेच बाहेरही भिंतीवर २-२ ब्लँकबोर्ड तयार करून घेतले . कार्यालयातील फळ्यावर शाळेची माहिती नांव ,वर्गवार पटसंख्या ,मुले,मुली , परगांवावरून येणारे विद्यार्थी ,अनुसुचित जाती , जमाती , ईतर मागास विद्यार्थी ……इ .माहिती खडू ओला करून लिहून घेतली .
(३ ) कार्यालयाबाहेरच्या फळ्यावर दररोज २-२ सुविचार ,दररोजच्या महत्वाच्या बातम्या लिहिण्याची जबाबदारी वेगवेगळ्या शिक्षकांवर सोपविली .
( ४ ) पिण्याच्या पाण्यासाठी गावातील कुंभाराकडून ४ माठ झाकणांसह देणगीत मिळाले , सुताराकडून माठ टेवण्यासाठी लाकडाचे स्टँड मिळाले ,.भांड्याच्या दुकानदाराने प्रत्येकी ६-६ पाणी काढायची भांडी , पेले …..इ .दिले. मुलांसाठी ,मुलींसाठी , शिक्षकांसाठी व कार्यालयासाठी अशी व्यवस्था झाली. माठात दररोज स्वच्छ धुऊन पाणी भरून ठेवण्यासाठी वर्ग ५ , ६ व ७ च्या मुला- मूलींच्यावर वर्गशिक्षकांच्या देखरेखेखाली जबाबदारी दिली .
(५ )पंचायत समितिकडून ४ नवीन तरटपाट मिळाले .शाळा समितिच्या सदस्यांकडून प्रत्येकी एक तरटपाट देणगी मिळाले .गावातील ईतर प्रतिष्ठित व्यक्तिंकडून मिटींगसाठी खूर्च्या , महापुरूषांचे फोटो देणगी मिळाले .
(६ ) जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून शाळेसाठी गेट व कंपांऊड लाऊन मिळाले.
(७ )सर्व शिक्षकांना मुख्यालयीच राहण्याचे प्रशासनाचे आदेश होते . त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने गावातच राहण्यासाठी भाड्याने खोली घेतली .
(८ ) शाळेच्या वाचनालयातील पुस्तके विद्यार्थी वाचनालयाच्या तासात वाचू लागले .
(९ ) १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन , २ आक्टोंबर गांधी-जयंती ,२९ नोहेंबर महात्मा फुले जयंती , २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन …ई .
च्यावेळी गांवातून लेझीमच्या तालावर मिरवणूक निघायची . शाळेत मिरवणूक विसर्जित व्हायची . विद्यार्थ्यांना प्रसंगोपात गोळ्या , चॉकलेट , मिठाई वाटप होत असे .
(१० )खेळाच्या तासात हुतूतू , खोखो , लंगडी …इ खेळ खेळले जात .
(११ ) शिक्षकांच्या वादविवाद स्पर्धा वेगवेगळ्या विषयावर प्रत्येक आठवड्याला आठवडी बाजारच्या दिवशी सुरू केल्या .
(१२ )शिक्षकांच्या मासिक सभांमध्ये शैक्षणीक अडचणी सोडविण्याबाबत चर्चाकरून निर्णय घेतले जात .

मुर्तिजापूर तालुका युवक कॉंग्रेसच्या शिबीराला माननीय शिक्षण राज्य-मंत्री श्री .रामनाथजी पांडे हजर राहणार होते . त्यासाठी शाळेच्या खोल्या वापरण्यासाठी लेखी परवानगी हातगांवच्या सरपंचांनी संवर्ग विकास अधिकारी ,पं .स. मुर्तिजापूर ह्यांचेकडून आणली होती .सायंकाळी सभेला मान .सरपंच हातगांव , सभापती पं .स . मुर्तिजापूर , तसेच कॉंग्रेसचे राजकीय पुढारी कार्यकर्त्यांसह हजर होते . शाळेतच कार्यक्रम असल्याने मी तब्येत ठीक नव्हती
तरी हजर राहणे आवश्यक होते . कारण शाळेला चपराशी नव्हता.
मेडशीचे निवृत्त मुख्याध्यापक श्री .हाते गुरूजी मुर्तिजापूर येथेच’भारतीय ग्ञानपीठावर प्राचार्य होते . त्यांचे मार्गदर्शनही मला मिळत होते .शाळेतील खेळाडू मुर्तिजापूर येथे खेळायला गेले गतवर्षीपेक्षा जास्त बक्षीसे जिंकून आले .
माझी निवड वाशीम अध्यापक विद्यालयात एक महिना मुख्याध्यापक प्रशिक्षणासाठी झाली . त्याचवेळी ति. रा. रा. बाबांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना अकोला येथे मोठ्या सरकारी दवाखान्यात भरती केले होते . दवाखान्यात ति. मुरलीधर थांबायचा , भोनहून श्री ,रामचंद्रकाका व श्रीयुत सदाशिवकाका मधून मधून येत होते . ति.बाबांना कफाचा त्रास होत होता . घशातून येणारा कफ चिकट होता . जुन्या आजाराची आठवण करून देत होता.
वैद्य गोपाळ सुताराचे त्यावेळचे औषधोपचार व त्याचे बोल आठवले . कदाचित म्हातारपणी ताकद कमी झाल्यावर पुन्हा चिकट कफाचा त्रास होऊ शकतो . दवाखान्यातील डॉक्टर राठोडांनी अँडमीट करून घेतले . औषधोपचाराने ति. बाबांची तब्येत सुधारायला लागली . त्यांनी मला वाशीमला ट्रेनिंगला जायला परवानगीही दिली . मी त्यावेळी सातव्या वर्गाच्या ईंग्रजी विषयाची गाईड छापून घेतली होती . त्याचे वितरण मला प्रशिक्षणार्थींना करायचे होते . त्याच्या प्रति कमी पडल्या त्यासाठी मी दुपारी २ वाजता मेडशीला घरी आलो होतो . तेथे माझी भेट श्री. कासारकाकांशी झाली . ते नुकतेच अकोल्याला दवाखान्यात ति. बाबांना भेटून आले होते . त्यांनी सांगितले की डॉक्टर श्री . राठोड ह्यांच्या आदेशाप्रमाणे ति .बाबांना पायाच्या घोडनसेतून सलाईन सुरू केलेले आहे .मी मेडशीला सौ. निर्मला ,कु ताई ,माई व प्रमोदला अकोल्याला जायची तयारी करायला सांगून वाशीमला Last Day ला दि.२८जानेवारी १९७५ ला एक महिन्याचे मुख्याध्यपकाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणायला गेलो . लगोलग मेडशीला परत आलो व रात्री ८ वाजताच्या एस .टी . ने अकोल्याला ति. हिंगणेकर मामांकडे रात्री १०.३० वाजता जाऊन पोहोचलो . ति. गं. भा .आजीने (आईची आई ) आम्हाला आता दवाखान्यात जाऊन फायदा नाही . फार ऊशीर झाला आहे ,घरीच थांबा असे सांगितले . आम्हा सर्वांना आजीने चहा -पाणी , जेवण करून घ्यायला सांगितले .
थोड्याच वेळात ति. हिंगणेकरमामा अचेतन बाबांना घेऊन घरी पोहोचलेे , घरात एकच हलकल्लोळ झाला . कोणी कोणाला समजावयाचे , आवरायचे काहीच समजेना .मला ,मुरलीधरला ति .मोठेमामांनी समजावले ,पोटाशी धरले ,सारखे पाठीवरून हात फिरवत राहीले .मी अचेतन बाबांजवळच रात्रभर बसून होतो . माझ्या डोळ्यातील अश्रूच आटले होते , घशातून रडण्याचाही आवाज येत नव्हता . ति .सौ .मोठ्यामामी , आजी , आईला ,ताई ,माईला समजावत होत्या. जेमतेम तीन वर्षाच्या प्रमोदला तर हे सगळे कां रडताहेत ? हेच समजत नव्हते . दि. २९ जानेवारीला दुपारी बाबांचा अंत्यसंस्कार अकोल्यालाच करण्यात आला. दि.३० जानेवारीला मला मुख्याध्यापक प्रशिक्षणानंतर हातगांवला शाळेवर हजर होणे अत्यावश्यक होते .त्याप्रमाणे मी सकाळीच हातगांवला शाळेवर हजर झालो . सर्वांना वडिलांच्या दु:खद निधनाची बातमी साश्रु नयनांनी सगळ्यांना सांगीतली व २ दिवसांची किरकोळ रजा घेऊन अकोल्याला परत आलो . तिसरा दिवशी अस्थि व रक्षा घेऊन कै .बाबांच्या ईच्छेप्रमाणे अकोला जवळच्या गांधीनगरला जाऊन पूर्णा नदीत अस्थि व रक्षा विसर्जन केले . १० वा ,१३ वा दिवस मेडशीला करण्याचे ठरविले .
आता सर्वप्रथम Legal Heir Certificate तहसीलदार , अकोला , ह्यांचेकडून तांतडीने कसे मिळवायचे ह्या विचारांत पडलो . कारण राहणार मेडशी ता.वाशीम ह्या पत्यामुळे उपरोक्त प्रमाणपत्र तहसीलदार वाशीमकडूनच घ्यावे लागले असते . अकोला येथील पोळा चौक प्रभागाच्या ( वार्डाच्या ) नगरसेवकाकडून आम्ही सर्व लोणकर कुटुंबीय , मूळ राहणार मेडशी ता. वाशीम , हे ,अकोला येथे पोळाचौकातील श्री .गायकर ह्यांचे घरात भाड्याने राहतात असे प्रमाणपत्र घेतले . कै .बाबांचे सरकारी दवाखान्यातून मिळालेले मृत्यू प्रमाणपत्र होतेच . अकोला तहसील येथील स्टँप व्हेंडरने सांगीतल्याप्रमाणे अँफेडेव्हीट केले आणी सगळी उपरोक्त कागदपत्रे सोबत जोडून वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी विनंती अर्ज अकोला तहसीलदारांकडे केला . त्याप्रमाणे त्यांनी कै .वामनराव बळीराम लोणकर यांचे वारसा प्रमाणपत्र आम्हाला दिले . मेडशीला कै.बाबांचे वास्तव्य १९५५ ते २८ जानेवारी १९७५ पर्यंत होते .मेडशी पंचक्रोशीत त्यांना सगळे पोतद्दार म्हणूनच आदरार्थी बोलवित , प्रेमाने जोडलेली अगणित मंडळी
मेडशी परिसरात होती . ती सगळी मंडळी कै .बाबांच्या मृत्युची बातमी कळताच खूपच हळहळली .त्या सर्वांनी आमचे सांन्त्वन केले . धीर दिला .
मेडशी शाळासुध्दा केन्द्रिय शाळा होती . २९ ,३०, ३१ जानेवारी १९७५ ह्या ३ दिवसांचा पगार चलानने भरण्यास देऊन उरलेल्या २८ दिवसांचा कै. बाबांचा पगार मिळाला , मेडशी परिसरातील सगळ्या लहान थोरांनी सर्वांनी आवश्यक ती सगळी मदत करून १० वा , १३ वा दिवसाचा कार्यक्रम आटोपला .मेडशीला अकोला ,पातूर ,बाळापूर , भोनचे सर्व नातेवाईक ह्या कार्यक्रमाला आले होते .

आता घरात कमावता फक्त मीच राहीलो . तसेच मोठा मुलगा ह्या नात्याने घरादाराची लहान भावंडांचे शिक्षण ,लग्न … ईत्यादी सगळी जबाबदारी फक्त माझीच होती . आता मेडशीला कोणालाही ठेवणे शक्य नव्हते . हातगांवला नेण्यापेक्षा अकोल्याला भाड्याने खोली घेऊन राहणेचा पर्याय ति.मोठेमामांनी सुचविला . सर्वानुमते हा पर्याय अतिशय योग्य वाटला . आता अकोल्याला तेही जुन्या शहरात दाबकी रोडवर घर शोधले . अकोल्याला ति . मोठेमामांचे जातायेता लक्ष राहणार होते . अकोला जिल्ह्याचे ठिकाण होते . तेथे शाळा , कॉलेज सह सर्व सोयी होत्या . मला हातगांवहून जाणे येणेही करणे शक्य होते .सकाळी व संध्याकाळी हावडा एक्सप्रेसने अकोला- मुर्तिजापूर-हातगांव करणे सहज शक्य होते . अकोला रेल्वे -स्टेशनवर आणि मुर्तिजापूर रेल्वे- स्टेशनवर प्रत्येकी एक सायकल ठेवली की , Up-Down करणेस कोणताही त्रास होणार नव्हता .मेडशीला १९५५ ते १९७५ वीस वर्षे कै. बाबा भोनहून येथे नोकरी निमित्ताने आले. त्यावेळी मेडशीला कै. तुळशीराम धरमकर हे एकमेव सोनाराचे घर होते . पाहतापाहता बाबा जणू मेडशीतचेच झाले , एव्हढे प्रेम मेडशी व परिसरातील ब्राम्हणवाडा , मारसूळ , रिधोरा , वाकळवाडी….ई मधील शिक्षकांनी , गांवकर्यानी त्यांना दिले . त्यांना सर्वच आदरार्थी संबोधत . मेडशीला नागनाथ हायस्कूल सुरू झाले , हायस्कूलच्या मुख्याध्यापकांच्या मुलाखतीच्यावेळी श्री .शेंडेगुरूजी (अमडापूर-बुलढाणा ), श्री,संगई ( पातूर ) ,श्री. थोरात ( चिखलगांव ) येथून आले . ह्या सर्वांचे मेडशीत आल्यापासून सदोदीद बाबाशी प्रेमाचे तसेच कौटुंबिक सबंध राहिले . तसेच हायस्कूल शिक्षक श्री .पाठक ( अमरावतीकर ) ,श्री . सावरकर ( मुर्तिजापूरकर ), श्री. राजकुमार आहाळे (मोठा राजूरा ) ,श्री . डॉक्टर सुधाकर देशमुख (डोंगरगांवकर )ह्यासगळ्यांशी प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध ते मेडशीहून बदलून गेले तरी कायम होते . सौ. आईने व ति. बाबांनी अत्यंत हलाखीत (गरीबीत ) दिवस काढले होते.आपण भोगलेला त्रास कोणालाही होऊ नये ह्यासाठी ते सदासर्वदा तत्पर असत . मेडशीतील सगळ्याच शिक्षक , शिक्षिका ईतकेच नव्हे तर पोलीस कर्मचारी , मलेरिया कर्मचारी , कृषी सहाय्य्क ह्यांच्या मदतीला सर्व प्रथम आठवण यायची ”श्री .पोतदार (लोणकर ) ” याचीच . गावांत कोणत्याही घरी आजारी वा कठीण प्रसंगी प्रथम धाऊन जाण्याची त्यांची सवयच होती .एकदा गावात संचार- बंदी होती ,पोलीसांचा कडक बंदोबस्त होता , पोलीस कोणालाही घराबाहेरपडू देत नव्हते . अशा परिस्थितीत पोलीस शेवटी माणूसच आहे , सरकार त्यांची चहा-पाणी ,नास्ता ,जेवणाचीसोय करू शकत नाही . त्यांना ऊपाशी पोटी, पाण्याशिवाय ड्युटी करावी लागते अशा वेळी ५० – ६० भाकरी आणि बेसन आईने तयार केले . बाबांनी जीव धोक्यात घालून दरवाजा थोडासा ऊघडला व एका पोलीसाला विनंती करून त्याच्या जवळ सगळे खाण्याचे व हंडाभर पाणी ,तांब्या दिला .त्यावेळी त्या पोलीसांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या .त्याने आपल्या सहकारी पोलीसांना बोलाविले . त्या सर्वांनी क्रमाक्रमाने जेवणं केली . सगळयांनी मनापासून ह्या दयाळू वृत्तिला सलाम केला . थंडीचे दिवस होते , मी मालेगांवहून दोन ब्लँकेट आणले होते . २-३ दिवसानंतर अचानक एक साधू आला . बाबांनी त्याला खायला दिले , पाणी दिले अंगात पतले कपडे होते . बाबांनी आईला नवे ब्लँकेट त्याला द्यायला सांगीतले . बाबा म्हणाले देव कोणाच्या रूपात येईल सांगता येत नाही. रंजल्या गांजलेल्यांना मदत करण्यांत आई-बाबा आपापल्या परिने हातभार लावत होते.

शेवटी सर्वानुमते अकोल्याला जुन्या शहरात दाबकी रोडवर भाड्याने घर घेऊन राहण्याचे ठरले . मेडशीचे लोकांचे घेणे – देणे आटोपून सगळयांचा निरोप घेवून आम्ही सर्वजण अकोल्याला आलो . श्री .रावजी टालवाल्याची खोली भाड्याने मिळाली . ति.मोठेमामांचे घर जवळच होते . मी हातगांवला शाळेवर हजर झालो.

हातगांव शाळा व परिसरातील शाळांमिळून विद्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्याचे ठरविले . सर्व विद्यार्थी ह्या कामात लागले .सोपे सोपे सायंसचे प्रयोग त्यामागील रहस्य त्या गटाचे विद्यार्थीच समजाऊन सांगत . हातगांवला स्काऊट पथक नव्हते , मी स्काऊट टीचरचे प्रशिक्षण घेतले होतेच . मुंबईला अखिल भारतीय स्काऊट मेळावा घेण्याचे ठरविण्यासाठी अकोला जिल्हा स्काऊट प्रमुख श्री .कुळकर्णीसरांनी मिटींगला मी अकोला येथे उपस्थित राहण्यासाठी गेलो . त्यानंतर आठवडाभर आजारी होतो . मी तसे पं . स .मुर्तिजापूरला व हातगांव शाळेलाही कळविले होते . हातगांव शाळेत मी वयाने लहान होतोच तसेच एकूण सेवाज्येष्ठतेनेही कनिष्ठ होतो .पण प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या ( M. A ., D . Ed . ) यादीत वरिष्ठ होतो . आमच्या हातगांव शाळेत मुर्तिजापूरचे श्री . देशमुख गुरूजीही पदवीधर होते . त्यांना माझी नेमणूक रूचली नव्हती . ते असंतुष्ट होते . माझ्याविरूध्द तक्रार करण्याची एकही संधी ते कधीही सोडत नसत . मी आजारी असतांना त्यांनी सरपंच हातगांव यांचेकडे श्री . लोणकर गुरूजी काहीही न सांगता गैरहजर आहेत. शाळा समिती अध्यक्ष या नात्याने सरपंचांनी दररोज प्रार्थनेच्यावेळी हजर राहून ‘आज रोजी शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापक श्री लोणकर गुरूजी गैरहजर आहेत . हया भेटीचा अहवाल पंचायत समितीला पाठविणेत यावा .’ स्वत: सरपंच पं . स. मुर्तिजापूर येथे जाऊन सभापती महोदयांना भेटून उपशिक्षणाधिकारी हयांना शाळेवर पाठऊन चौकशी करण्याची विनंती करीत . शेवटी एके दिवशी सभीपतींनी श्री .खानझोडेसाहेबांना हातगांव शाळेवर जाऊन चौकशी अहवाल देण्यास सांगीतले . श्री . खानझोडे साहेबांकडे माझा आजारी असल्याबाबत डॉक्टरांचे प्रमाणपत्र मिळाले होते.
श्री.खानझोडे साहेब हातगांव शाळेत गेले . सगळी चौकशी करतांना श्री. लोणकर कधीपासून शाळेवर आलेले नाहीत ? त्यांनी त्याबाबत काही कळविले आहे काय ? असल्यास केव्हा ? ते वारंवार काहीही न कळविता गैरहजर राहतात काय ? श्री.ठाकरे गुरूजींकडे पोस्टाचा कार्यभार होता . त्यांनी सांगीतले की कालच्याच टपालात श्री .लोणकर गुरूजींचे पत्र व आजारी असल्याबाबत वैद्यकीय दाखला पाठविलाआहे . ते ३ दिवसाच्या स्काऊट मिटींगला अकोल्याला गेले होते , तेथेच आजारी पडले . त्याबाबतचा वैद्यकीय ऊपचार घेत असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी शाळेला पाठविले आहे , त्याची प्रत पं. स . ला पाठविली आहे . ते नियमित कामावर असतात . त्यांनी कार्यभार घेतल्यापासून शाळेची ऊपस्थिती वाढली आहे , निरनिराळे ऊपक्रम ते सतत राबवित असतात .आतापर्यंतच्या ईतिहासात नुकतेच विदञान प्रदर्शन हातगांव केंद्राच्या परिसरातील शाळांच्या सहभागाने यशस्वीरित्या पार पडले आहे ,तसेच कधी नव्हे ती शाळा समितीची मसिक सभा घेऊन सगळा हिशेब व शाळेच्या प्रगतीचा लेखा-जोखा पारदर्शी पध्दतीने समोर ठेवत असतात . श्री .खानझोडे साहेबांनी शाळा समिति अध्यक्षांनाही प्रत्यक्ष बोलावून ह्याबाबत विचारणा केली . तसेच ईतर शाळासमिति सदस्यांनाही विचारणा केली असता त्यांना सत्य परिस्थितिचे आकलन झाले. नंतर त्यांनी पंचायत समितीला आलेले पत्र व माझे आजारी असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्रही सर्वांना दाखविले. चौकशी अहवालात सगळ्या बाबींचा उहापोह करून सभापतीं मुर्तिजापूर आणि संवर्ग विकास अधिकारी यांना अहवाल सादर केला .आजारातून बरा झाल्यानंतरचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन मी शाळेवर हजर झालो . कामावर रूजुं झाल्याचा अहवाल वैद्यकीय प्रमाणपत्रासह संवर्ग विकास अधिकारी ,पंचायत समिती ,मुर्तिजापूरला पाठविला .
डिसेंबर १९७५च्या शेवटच्या आठवड्यात आरेकॉलनी , गोरेगांव , पश्चिम ,मुंबई येथे अखिल भारतीय स्काऊट आणि गाईड मेळावा आहे ,त्यासाठी स्काऊट सुपरवायझरच्या पदावर तसेच श्री.कुळकर्णी, जिल्हा प्रमुख , स्काऊट / गाईड , ह्यांचे मदतनीस म्हणून माझी निवड करणेत आल्याचे आदेश मला प्राप्त झाला.त्याप्रमाणे मी मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली . ति. गं .भा .आईने माझ्यासाठी तहानलाडू भुकलाडू तयार करून दिले . मी श्री. कांबळे गुरूजींच्या भाऊराव कांबळेचा पत्ता घेतला . माझे सोबत मुर्तिजापूर पंचायत समितीतून आणखी एक शिक्षक श्री. भडंगेसुद्धा होते . आम्ही गोरेगांव आरे कॉलनीतील स्काऊट /गाईड कँपच्या जागेवर पोहोचलो . संपूर्ण भारतातून आलेल्या शिबीरार्थींना त्यांच्या त्यांच्या तंबूत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे आमचेकडे दिले होते . तसेच सर्वसाधारण बाबींकडे लक्ष देण्याची जबाबदारीही आमचेवरच होती . मुंबईत फिरण्यासाठी जातांना स्काऊट ड्रेसमध्येच जाण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या . मुंबईच्या लोकल गाड्या नऊ डब्यांच्या होत्या .प्रत्येक स्टेशनवर १/२ मिनिट् थांबायची . तेव्हड्या वेळेत लोक लोकल मधून चढायचे /उतरायचे काम करीत . जवळ जवळ ८ दिवस मला भाऊराव कांबळेचा ऑफीसचा पत्ता सापडला नाही .३०डिसेंबर १९७५ ला मात्र मला पत्ता सापडला .भाऊराव कांबळेकडून विक्रिकर भवनाचा पत्ता घेतला. तेथे आयुक्तांचे कार्यालयातील संबंधित लिपिकाकडे गेलो . तो काय आश्चर्य माझा विक्रीकर निरिक्षक पदाचा नियुक्ति आदेश त्यांच्या टेबलवरच होता .पत्ता मेडशीचा होता .मी त्यांना विनंती करून अकोल्याच्या ति. हिंगणेकरमामांच्या दाबकी रोड , जुने शहर , अकोला ह्या पत्यावर तो आदेश पाठविण्याची व्यवस्था केली .
अकेल्याला परत येतांना शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाची पहिली योजना रद्द करून मी सरळ अकोल्याला परतलो .ति. मोठे हिंगणेकरमामांना आणि घरी मुंबईचे वृत्त् सांगीतले . विक्रीकर निरिक्षक पदावर नियुक्तिचा आदेश आठवडाभरात मिळेल असा अंदाज सांगीतला . ति. मोठेमामांच्या मते शिक्षकाची नोकरीचा राजीनामा द्यावा ,पण एक महिन्याची पूर्व सूचना देऊनच . ह्याचा फायदा शिक्षकाची नोकरी कायम स्वरूपाची असल्याने पूर्व सूचना न देता तडकाफडकी राजीनामा दिल्यास नियमा प्रमाणे ३ महिन्याचा पगार भरावा लागेल तो वाचेल .तुला तेथे ३ महिन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल .
विक्रीकर विभागाने पाठविलेला माझा विक्रीकर निरिक्षक नियुक्ति आदेश दिनांक ३ जानेवारी रोजी रजिस्टर पोस्टाने पाठविला . सदर रजिस्टर पत्र मामांकडे आले परंतू त्यावर माझे नाव असल्याने पोस्टमनने ते दिले नाही . रात्री मी हातगांवहून परत आल्यावर मला ते समजले .मी लगेच दुसर्या दिवशी मुख्य पोस्ट ऑफीसात जाऊन बीट पोस्टमन कडून ओळख पटवून रजिस्टर पत्र ताब्यात घेतले .सोबत मुरलीधरला आणले होते ,त्याच्याकडे ति.हिंगणेकरमामांना व घरी दाखविण्यासाठी ते रजिस्टर पत्र दिले . मी हातगांवला गेलो ,मुर्तिजापूर पंचायत समितीत श्री . खानझोडे साहेबांना ही बातमी पिथम सांगीतली , त्यांनीही राजीनामा पूर्वसूचना देण्याचा सल्ला दिला. हातगांवला शाळेत ही बातमी सांगताच सर्वींची मने आनंदून गेली . मी डॉ. सुधाकर देशमुखांच्या मोठ्या भावाचा ,श्री .भास्करराव देशमुखांचा ,वांद्रा ( पूर्व ), मुंबईचा पत्ता , तसेच ती .गं. भा .आईच्या मैत्रीणीचा मुंबईचा पत्ता घेतला .
मी दिनांक ६/१/१९७६ ला राजीनामा पुर्वसूचना पत्र माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी , जिल्हा परिषद ,अकोला ह्यांना पं. स. मुर्तिजापूर व शिक्षणाधिकारी जि . प .अकोला मार्फत पाठविले . श्री. माटे ,प्रसिध्दी अधिकारी, जि .प . अकोला आणि श्री . आगरकर ,उपशिक्षणाधिकारी ,जि . प.अकोला ,(दोघेही माझे शाळेतील शिक्षक होते .)ह्यांनाही सगळे वर्तमान सांगीतले. दोघेही खूप आनंदले . त्यांनी मुंबईला जाण्याचा माझा निर्णय अगदी योग्य असल्याचे ठामपणे सांगीतले . तुमच्या प्रगतीची हीच योग्य दिशा आहे . आगे बढो ! ईश्वराचे तुम्हाला पुढे ह्यापेक्षाही अधिक प्रगतीसाठी सहाय्य लाभणार आहेच . तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही सगळे आहेातच , ह्याची खात्री बाळगा . शाळेचा कार्यभाराची यादी तयार झाली ,माझ्या शाळेतील सिनियर शिक्षकाला चार्ज दिला . माझ्या निरोप समारंभाला परिसरातील सर्व शाळांचे शिक्षक , गावातील प्रतिष्ठीत व्यक्ति ,शाळा समिती सदस्य ह्याशिवाय एकूण ३७५ विद्यार्थ्यांपैकी ३६० विद्यार्थी उपस्थित होते .मला ह्यावेळी घुसरच्या श्री .गोरले गुरूजींच्या भविष्यवाणीची प्रकर्षाने आठवण झाली . त्यांनी १९६३ सालीच माझ्या शिक्षकाच्या प्रथम नियुक्तिच्या वेळीच मला ”तुम्ही भविष्यात वर्ग १ , अधिकारी होणार ” असे सांगीतले होते .
मी माझ्या भाषणात सांगीतले की ,मी तुम्हा सर्वांच्या आठवणी सोबत घेऊन जाणार आहे . मी आता मुंबईला सजीव नसलेल्या कागदांच्या सोबत राहणार आहे. त्यांच्यासोबत राहणार , बोलणार आहे . तेथेही माझा मोठा मित्रपरिवार असणार आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार,काही अधिक -ऊणे बोललो असल्यास क्षमस्व .
तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनेा शिकून खूप मोठे व्हा ,आई-वडीलांचे ,गावाचे ,शाळेचे नांव उज्वल करा .भविष्य काळात कोठे भेटलात तर ओळख ठेवा.मुर्तिजापूरला श्री.हाते गुरुजींना भेटलो ,तेही आनंदून गेले ,अन म्हणाले कै.पोतदार स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद देत आहेत . तुम्ही वर्ग १ अधिकारी निश्चित होणार आहात .
सर्वांचा शिक्षक वर्गाचा,गावकर्यांचा निरोप घेऊन अकोल्याला घरी आलो . माझे स्काऊट बेडींग व ईतर आवश्यक सामानाची पेटी तयार झाली .चि. मुरलीधर , ज्योतीताई , सुषमा उर्फ माई व चारच वर्षाच्या प्रमोदची काळजी करू नकाेस असे सगळ्यांनी सांगीतले . कै .बाबांची मनातील अतृप्त ईच्छा पूर्ण करण्याचे बळ मिळावे म्हणून प्रार्थना केली . मुंबईला पहिले तीन महिने प्रशिक्षण काळात मला रू. १५०/-एव्हढीच रक्कम मिळणार होती . ति, रा . रा. मोठेमामांनी मला रू .५००/- खर्चासाठी दिले . घरून भुकलाडू ,तहान लाडू दिले होते .

ति.मोठेमामांनी मला , जिल्हाधिकारी , अकोला कार्यालयातील लिपिक ,श्री.खान हे रविवार दिनांक ८/२/१९७६ रोजी सायंकाळी हावडा एक्सप्रेसने मुंबईला जाणार आहेत , ही माहिती दिली . त्यामुळे मला माझ्या मुंबईपर्यंतच्या प्रवासात साथीदार मिळाला . सगळ्या वडील मंडळींचा आशिर्वाद घेऊन ति.रा. रा.मोठेमामा व मुरलीधर सेाबत अकोला रेल्वे स्टेशनवर आलो . हावडा एक्सप्रेसने श्री. खान लिपिकासोबत माझे स्काऊट बेडींग आणि पेटी घेऊन मुंबईला निघालो .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)