मुक्काम घुसर :

माझी शाळेतील सगळया गुरूजनांशी , मुख्याध्यापक श्री .मानकर गुरूजींनी ,ओळख करून दिली. सगळ्यात वृध्द श्री. गोरले गुरूजी होते . अकोला जवळ असलेल्या भौरदचे गावंडे गुरूजी होते . मी एकटाच सर्वात तरूण, कॉलेजमध्ये शिकलेला होतो. इतर सर्वजण १०-१५ वर्ष अनुभवी शिक्षक होते. बहुतेक शिक्षक ७ वी झालेले , आणि नॉर्मल स्कुल मधून शिक्षकाचे ट्रेनिंग घेतलेले , विवाहीत ,मुले, मुली असलेले होते. अकोला पंचायत समिति समितिचे सभापति , श्री. ओंकारराव पागरूत घुसरचेच राहणारे होते. घुसरचेच डॉक्टर पागरूत ह्यांनी शिक्षक पदाचा राजीनामा दिला होता . त्यांच्याच तिसर्या वर्गातील मुलांना, मला शिकवावयाचे होते . आतापर्यंत मी शिकत होतो. ह्यापुढे मला लहान मुलांना गोडीगुलाबीने शिकवावयाचे होते , न चिडता , शक्यतो न मारता . ते जानेवारीतील थंडीचे दिवस होते .
माझ्यासाठी २-४ महिने राहण्यासाठी घराचा शोध सुरू होता .मला शाळेजवळच राहण्यासाठी जागा मिळाली . माझेसोबत श्री . गावंडे गुरूजी राहायला आले . मी वातीचा स्टोव्ह , पोळपाट ,बेलणे , तवा , सराटा ,दोन पातेले , चमचे , पकड , चहागाळणी , दोन कपबशा …इ . आणले होते . मी बनविलेली पहिली पोळी म्हणजे आस्ट्रेलीयाचा नकाशा झाला होता . आतापर्यंत कधीही स्वयंपाक करायचे कामच पडले नव्हते . श्री . गावंडे गुरूजींनी मला हात न लावता पोळपाटावर गोल पोळी कशी लाटावी , ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले . चवीष्ट चहा , भाजीही करायला शिकविले . घुसर हे गांव फार मोठे नव्हते . तेथे पिण्याचे पाणी गावाजवळच्या एकमेव तलावातून आणावे लागायचे . ऊन्हाळ्यात तलाव आटायचा . काही व्यक्ति कावडीने पाणी पुरविण्याचा व्यवसाय करीत .
मी सुटीच्या दिवशी अकोल्याला मामांकडे जायचेा .ति.गं. भा.आजीला ‘ घुसर ‘ हे गांव अकोला येथून ८ मैलावर , खारे-पाणी पट्यात आहे ,पिण्याचे पाणी गावाजवळच्या तलावातून आणावे लागते . २५- ३० वर्षापासून घुसर गांवात फार बदल झालेले नाहीत ,सगळे माहिती होते.
शिक्षकांचे एक दिवसाचे शिबीर जवळच्या आपातापा येथे होते . पोट-शिक्षकांची तेथे सभाही होती . त्या दिवशी आम्ही शिक्षक-शिक्षिका सकाळीच ३ मैल पायी चालतच आपातापा येथे पोहोचलो . मी एकटाच कोट-प्यांटमध्ये होतो .सर्वात तरूणही होतो . आमच्या मुख्याध्यापकांनी माझी सर्वांशी ओळख करून दिली . चहा ,नाश्ता झाल्यावर सगळ्यांनी आपापल्या अडचणी मांडल्या . मार्च-एप्रीलमध्ये घ्यावयाच्या परिक्षेबाबत पंचायत समिती , विभाग- शिक्षणाधिकारी यांचेशी चर्चा , झाली . त्यांनी सविस्तदर मार्गर्शन केले . मध्यंतरात जेवणे झाली.पुन्हा चर्चासत्र सुरू झाले.सायंकाळी कार्यक्रम संपला .दरम्यान मला अस्वस्थ वाटू लागले.कुणाचेतरी डोळे माझा पाठलाग करताहेत असे मला वाटत होते. घुसरला सर्वजण परत आलो. त्या रात्री मी ग्रामपंचायत गोडाऊन मध्ये मलेरिया कर्मचार्यांसोबतच झोपलो. मला खूूप ताप आला. दुसर्या दिवशी मी डॉक्टरांचा सल्ला घेतला ,अतिशय थकवा आला होता.मी तांतडीने मेडशीला जायचे ठरविले. मोटार स्टँडवर मिळेल त्या एस .टी .ने मेडशीला निघालो . त्यावेळी डव्हा येथे श्री. नाथ नंगेमहाराजांची यात्रा सुरू होती.मी मेडशीला रात्री १० वाजता कसाबसा घरी पोहोचलो. ति.सौ.आईने दरवाजा उघडला ,मी आsssईss एवढीच हाक मारली नी घाडकन खाली बेशुध्द होउन पडलो . शुध्दिवर आलो तेच मुळी ३ तासांनी. मेडशीचे डॉक्टर पाठक तोपर्यंत माझ्याजवळच बसून होते .सर्वांना हायसे वाटले. १५ दिवसांनी प्रकृतित सुधारणा झाल्यावर डॉक्टर पाठकांच्या परवानगीने कामावर जायचे ठरविले. डॉक्टरांचे तसे मेडीकल सर्टिफिकेट घेतले. ति.आईच्या मते मला कोणीचीतरी जबरदस्त नजर लागली असावी. डॉकटर पाठकांच्या मते मला ‘व्हायरल फिवर ‘ आला होता.मला आईने विचारणा केली , त्यावेळी मी अगोदरच्या दिवशी आपातापा या गावाला शिबीराला गेल्याची हकिगत सांगितली. त्या रात्रीच मला अचानक अस्वस्थ वाटू लागले, कोणीतरी माझ्याकडे एकसारखे पाहत आहे .पाहणराचे टपोरे डोळे , माझा सतत पाठलाग करित आहेत ,असा भास होत होता हे सांगीतले. हे सगळे ऐकल्यावर आईने माझ्यावरून मीठ – मिरच्या ओवाळून चूलीत विस्तवावर टाकल्या . त्यावेळी कोणालाहि ठसकाss आला नाही,मग मात्र आईची खात्रीच झाली की मला नक्कीच नजर झाली होती. आजारातून बरे झाल्यावर सुमारे १५ दिवसांनी मी वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन पुन: शाळेवर हजर होण्यासाठी मेडशीहून निघालो .

मी घुसरला शाळेवर हजर होण्यासाठी अकोल्याला अकोट स्टँडवर गेलो. तेथून टांग्यात बसून घुसरला निघालो.टांगा बाबू टांगेवाल्याचा होता.जाताजाता गोष्टी सुरू झाल्या,त्यावेळी शाळेच्या गोष्टिही निघाल्या.घुसर गांव तसे चांगलेच आहे.अकोला ह्या ८ मैलावरच्या, जिल्ह्याच्या ठिकाणाशी चांगल्या रस्याने जोडलेले आहे.गांवाला तलावाचे पाणी पिण्यासाठी आणावे लागते . उन्हाळ्यात तलावाचे पाणी कमी होते.तेवढाच त्रास आहे .अकोला पंचायत समितीचे सभापती, श्री. ओंकारराव पागरूत हे घुसरचेच आहेत. गांवात माध्यमिक शाळा ,सातव्या वर्गापर्यंत आहे. हेडमास्तर ,श्री. मानकर खूप अनुभवी आहेत.सगळे मास्तरही अनुभवी आहेत.आता काळानुरूप ३-४ जण नवीनआले आहेत.दोन शिक्षिका आहेत, त्या
अकोल्याच्याच आहेत. नवीन आलेले दोन शिक्षक,तेही तरूणआहेत, अकोल्याचेच आहेत. पण त्यापैकी नवीन आलेल्या श्री. लोणकर गुरूजींना मला भेटायचे आहे. ते १० – १५ दिवस सुटीवर गेलेले आहेत . तसे ते गुरूजी खूप शिकलेले आहेत . सर्व मुला – मुलींना ,गुरूजींना आवडतात. पण माझ्या तिसरीतल्या मुलाला त्यांनी हातावर स्केलने मारले होते,त्याचा अंगठा २ दिवस दुखत होता. मी श्री. बाबू टांगेवाल्याच टांग्यात त्याच्या जवळच बसलो होतो. मी त्याला विचारले ,त्या गुरूजींनी फक्त तुमच्याच मुलाला का बरे मारले असावे ? त्यावर बाबू टांगेवाला म्हणाला,नाही , नाही त्या गुरूजींनी , सर्वच मुलांना १ – १ छडी मारली होती कारटं तस मस्तीखोरच आहे. त्यानच छडी मारायच्यावेळी हात फिरवला आसल ! छडी लागली अंगठयावर. पोरान तस कबूलही केल आहे .माझ्या मनात आता त्याचा राग नाही.

पण मला त्या गुरूजींना भेटीयच आहे,एकदा तरी . तोपर्यंत गांव आलं होत .त्याने मला विचारले, तुम्हाला कोठे जायचे आहे गांवात ? नवीनच दिसता , म्हणून विचारले ! मी म्हणालो मला शाळेत काम आहे. आम्ही सगळे खाली उतरलो. बाबू टांगेवाला म्हणाला चला , मलाही शाळेतच काम आहे , सोबतच जावु . आम्ही दोघेही शाळेत पोहोचलो . ऑफीसात गेलो , सर्वांना नमस्कार केला.
सर्व गुरूजींनी ही माझे स्वागत केले , नमस्कार ! या लोणकर गुरूजी, आता बरं वाटतयना ? आम्हा सर्वांना तुमचीच काळजी वाटत होती .शाळेतील विद्यार्थिही तुमची वाट पहात आहेत . दोन महिन्यातच तुम्ही सगळ्यांना लळा लावला . माझ्या सोबत बाबू टांगेवाला आला आहे हे सगळे विसरूनच गेले होते .

आमच्या शाळेत ऑफीसमध्येच पोस्टऑफीस होते . शाळेचे मुख्याध्यापकच पोस्ट-मास्तरही होते.श्री. मानकर गुरूजींनी बाबू टांगेवाल्याला बसायल सागितले. काय काम काढलं आहे बाबू ? बाबू म्हणाला , ‘ मी लोणकर गुरूजींनाच पाहायला आणि भांडायला आलो होतो. मग त्याने मुलाच्या अंगठ्याला मारामुळे आलेल्या सुजेबद्दल सांगीतले , नवीन आलेल्या गुरूजींनी सर्वांबरोबर मारले म्हणालं पोरगं . त्यांनाच पाहायला व भेटयला आलो होतो . आता समजलं हेच ते नवीन आलेले लोणकर गुरूजी ! अहो हे गुरूजी अकोल्याहून माझ्याच टांग्यात आले ,आमच्या खुप गप्पा रंगल्या ,मलाही हे गुरूजी आवडले ,तुमच्या सर्वांना आवडले तसेच.आता माझ्या मनातला राग केव्हाच गेला. ह्या गुरूजींनी मुद्दाम , दुखापत व्हावी म्हणून मारलं नव्हत. माझ्याच मस्तीखोर कारट्यान हात ओढला म्हणून छडीचा मार अंगठ्यावर लागला . हे मला पटलं आता . मी बाबू टांग्यावाल्याची माफी मागीतली . तो म्हणाला’ तुमची चुकच नाही ! तर माफीची गरज नाही . उलट गांवात तम्हाला कोणताही त्रास झालाच तर मी तुमच्यासोबतच राहीन. पुन्हा भेटूच .
सर्व गुरूजनांना बाबू टांगेवाला पहेलवान माणूस आहे, तो केव्हा बिथरेल नेम नसतो हे माहीती होते. पण आता सर्वांची काळजी मिटली होती . मी डॉकटरांचे सर्टिफिकेट व गैरहजेरीच्या काळासाठी रजेचा अर्ज श्री. मानकर गुरूजींना दिला. परिक्षा जवळ आल्या होत्या. मला परिक्षाप्रमुखाची जबाबदारी सर्वानुमते दिली गेली . श्री . गोरले गुरूजींनी माझी कामाची पध्दति खूपच आवडली .त्यांनी सर्वांसमोरच भविष्यवाणी केली , ” श्री . लोणकर गुरूजी मोठे साहेब होतील .” मी दर आठवडयाला अकोल्याला मामाकडे जायचो त्यावेळी श्रीमती मोहरीलबाई सोबत असायच्या ,त्यांचा लहान भाऊ माझ्यासोबत इयत्ता ९-१० -११ ला शाळेत शिकत होता . तो भुमितीत फार हुषार होता.१० वीत असतांनाच ११ वीची भुमितीची प्रमेय स्वत:च तयार करून सरांना दाखवायचा . श्रीमती मोहरीलबाई जुन्या शहरातच साधुबुवाच्या मठजवळच राहायच्या . त्यांच्या घराजवळच पुढे दाबकी रोडवर ति. मामांचे घर होते . श्रीमती करमरकरबाईही अकोल्याच्याच ,रतनलाल प्लॉटमध्ये राहायच्या. त्यांचे वडील अकोल्यालाच नगरपालीका शाळा क्रमांक १ मध्ये प्राथमिक शिक्षक होते . वर्ग पहिली ते सातवी च्या परिक्षा वेळापत्रकाप्रमाणे , पार पडल्या . इयत्ता चौथी आणि सातवीच्या सार्वत्रीक परिक्षाही पार पडल्या.

घुसरला मधून मधून सप्रे बंधू नाटक कंपनी येत असे. ह्या कुरणखेडच्या कंपनीने निरनिराळी मराठी नाटके बसविलेली होती. काम करणारे सगळे नट , नट्या एकाच कुटुंबातील होते. त्यावेळी नाटक बंद स्टेजवर असे. स्टेजच्या समोर मोठ्ठ्या चौकोनी खड्यात गांवातील प्रतिष्ठीत व्यक्तिंना आमंत्रित करून बसविले जाई. गांवातील आणि आजूबाजूच्या गांवातील प्रेक्षकवर्ग आपापली सतरंजी घेवून बसत असत. नाटकाच्या जागेभोवती कपड्याचे पडदे लावलेले असायचे. त्यावेळी प्रसिध्द झलेली त्यांच्या नाटकापैकी ‘भांडखोर बायको ‘ हे गमतीदार नाटक सर्वांना खूप आवडायचे. साध्यासाध्या संवादातील मजेदार व निख्खळ विनोदामुळे सर्व प्रेक्षकवर्ग खळखळून हसत असे .” घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाssणा !, आयुष्याचा नाश होतो, राम तरी म्हणाना ” हे पद माझ्या
आजही स्मरणांत आहे. ‘जाssरे भटजीला घेऊन ‘ये ‘ अर्घवट ऐकून मुलगा जाऊन ‘भटजी ‘ ऐवजी ‘ ट ‘गाळून बाजूच्या हॉटेलमधून १ किलो ‘ भजी ‘घेऊन येतो.हे काय ? मुलगा विचारतो ,पुरतील ना !, तळलेल्या मिरच्या वेगळ्या आणल्या आहेत !, गावात किर्तन करणारे बुवा महाराज एका मुलाला बाजूच्या दुकानातून ‘ ‘ खडीसाखर ‘आणयला पाठवितात . तोपर्यंत बुवा महाराजांचा ‘ अभंग ‘ संपलेला असतो . ‘ तssर तुकाराम महाराज काय म्हणतात ? ‘ तेवढेयात परत आलेला मुलगा येऊन मोठ्या आवाजात सांगतेा ,” खडीसाखर नाही ! संपली म्हणतात ”

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या नी ”अप्रशिक्षित शिक्षक जादा शिक्षकांना ” मे आणि जुन २ महिन्यासाठी अकोला जिल्हा शिक्षणाधिकार्यांच्या आदेशाप्रमाणे कमी करण्यात आले . मला सर्व शिक्षकांनी एका छोट्या समारंभानंतर निरोप दिला. मी सर्व गुरूजनांचे व गांवकर्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. विशेषत:बाबू टांगेवाल्याने मला अकोल्याला मामाच्या घरी रोहोचविले. मी घुसरच्या वयोवृध्द श्री.गोरले गुरजींची ”तुम्ही मोठे वर्ग १ अधिकारी होणार ”ही ,’भविष्यवाणी ‘ सदोदित लक्षात ठेवली. भौरदच्या श्री. गावंडे गुरुजींनी हातही न लावता गोल पोळ्या कशा लाटायच्या ह्याचे तंत्र शिकविले . त्या अगोदर माझ्या पोळ्या श्रीलंकेचा – आस्ट्रेलीयाच्या नकाशाच्या प्रतिकृतीच असायच्या . श्री .दोळ गुरूजींकडून थोडी नाट्यकला शिकलो . इतर सहकार्यांकडून प्रेमाची देवाण घेवाण आणि मनाची शांतता ठेवणे ….इ. , शिकण्याचा प्रयत्न करणे शिकलो .माझ्या भावी नोकरीच्या काळात मला ह्या सगळ्यांचा खूप उपयोग झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)