अन्वीमिर्झापूर

उन्हाळयाच्या सुटीनंतर ‘अप्रशिक्षित जादा शिक्षकांना ‘१ जुलै १९६४ पासून पुन: नियुक्तीचे आदेश अकोला, जि.प.शिक्षणाधिकारी यांनी दिले.त्याप्रमाणे मला पंचायत समिती ,अकोला मधील अन्वी-मिर्झापूर येथे प्राथमिक शाळेत नियुक्ति
मिळाली.अन्वीमिर्झापूर हे गांव अकोला मुर्तिजापूर ह्या मध्य-रेल्वेच्या मार्गावरील बोरगांव रेल्वे स्टेशनपासून चार फर्लांगावर आहे.तेथील जि.प. प्राथमिक शाळेवर माझी जादा शिक्षक म्हणून नेमणूक झाली . तेथे कारंजाचे , श्री. देशमुखगुरूजी मुख्याध्यापक होते . ह्या व्यतिरीक्त पळसो-बढेचे श्री.बढे गुरूजी,श्री.तायडेगुरूजी व शेगांवचे ,श्री. बायसगुरूजीही होते. मी कामावर रूजू झालेा, पाचवा जादा शिक्षक महणून .मी आणि श्री. बायस गुरूजी बन्सीधरांच्या खोलीत राहायला लागलो . सायंकाळी आम्हीआठजण जेवावयाला एकत्र बसत होतो . श्री.हरिभाऊ आणि श्री.शंकरराव हे दोन मळेवाले,श्री.देशमुखगुरूजींचे भाऊ सगळे मिळून एका कुटूंबातीलच होतो , जणू . कामावर रुजू झालो त्यादिवशी मी मामाच्या घरून डबा आणला होता . दुपारच्या सुटीत श्री.तायडेगुरूजींनी घरी जातांना मला त्यांच्या घरी जेवायला चलण्याचा आग्रह केला .त्यांचे घर शाळेच्या जवळच होते.मला जातीभेद मान्य नव्हता. श्री.तायडे गुरूजी बौध्द होते . त्याच दिवशी दुपारच्या सुटीत मी त्यांच्या घरी जेवायला गेलो. त्यांच्या घरी म्हातारी आई , पत्नी , मुलगा मिळून ४ जणांचे चौकोनी कुटूंब होते . त्या दिवशी म्हातारीने तुरीच्या दाण्याचे मसाल्याचे वरण केले होते .ते मला फार आवडले

तेथील श्री.कादरपाटील , हे गांवचे पोलीस पाटील होते .त्यांचा लहान मुलगा तिसरीत शिकत होता .त्याला तिसरीत असुनही काहिच येत नव्हते. त्याची शिकवणी कोणीही घ्यायला तयार नव्हते ,मला सर्वांच्या आग्रहाखातर त्याची शिकवणी घ्यावी लागली .येथेही वयाने सगळ्यात लहान /अननुभवी पण शिक्षण सर्वात जास्त .श्री.कादर पाटलाचा एक मुलगा कॉलेजमध्ये अकोल्याला शिकत होता ,तर दुसरा मलगा बोरगांव-मंजू येथे दहावीत शिकत होता. त्या दोघांचीही शिकवणी घ्यावी , असा पोलीस पाटलांचा आग्रह होता. परंतू मला वेळे अभावी वरच्या वर्गातील मुलांची शिकवणी घेणे शक्य होणार नाही असे मी कादर पाटलांना प्रत्यक्ष भेटून सांगीतले . त्यांच्या लहान मुलाच्या शिकवणुकीबाबत मी त्यांना दोन अटीं सांगितल्या (१ ) मी त्यांच्या घरी शिकवणीसाठी येणार नाही , मुलाला मी माझ्या घरी शिकवीन.(२ ) मी दरमहा २० रूपये प्रमाणे चार महिन्याचे ८० रूपये अगोदर घेईन , त्याची प्रगती पाहून पुढे योग्य तो निर्णय घेऊ. श्री.कादर पाटलांनी सर्व अटी मान्य केल्या . शिकवणी सुरू झाली मुलगा सकाळी ८ वाजता शिकवणुकीला येवू लागला , मी घरचे काम करता करता शिकवायचो . दोन महिन्यात मुलाची चांगली प्रगती झाली . श्री.कादर पाटलांना बरे वाटले . त्यांचे घरी दुधदुभते होते ,त्यांचे घरून दही ,ताक , दूध ,..इ. मधून मधून पाठविले जायचे . श्री .बायस्कर गुरूजींना स्वयंपाक चांगला येत होता , मधून मधून कढी छानच बनवायचे ,भाज्यासुध्दा छानच करायचे .

त्यावेळी जिल्हा परिषदेच्या खाती पगाराची ग्रँट शासनाकडून न आल्याने तीन महिन्याचा पगार कोणालाच मिळाला नव्हता. मला B.Sc. Part One च्या परिक्षेचा Supplementary चा अर्ज भरायचा होता . परंतू परिक्षा फी ५० रू. भरायची सोय कशी करावी ? मला मार्ग सुचेना ! मुख्याध्यापक श्री. देशमुखगुुरूजीं आणि श्री.बायस्करगुरूजींना एक मार्ग सुचला . बोरगांव-मंजू रेल्वे-स्टेशनवर अकोल्याच्या श्री.हाशमशेटचा बंगला आहे .त्यांचेकडून ५० रूपये हातऊसने घेवून पगार झाल्यावर परत देता येतील.मला हा विचार पटला .त्याप्रमाणे त्याचदिवशी शाळा सुटल्यावर श्री. हाशमशेटच्या बंगल्यावर जायचे ठरविले .श्री.देशमुखगुरूजी आणि श्री.बायस्करगुरूजींना घेवून मी सायंकाळी जेवणं झाल्यावर श्री.हाशमशेटच्या बंगल्यावर पोहोचलो .त्यांना सर्व समजावून सांगीतले .त्यांना आपला एका शिक्षक उच्च शिक्षणासाठी धडपडतो आहे ,ही बाब फार आवडली.त्यांनी लगेच ५० रूपये काढून दिले.परत घरी येतांना श्री.बायस्कर अंधारातून येतांना विंचू चावला . ह्यापुढे मला पुढे कोणतीही अडचणआल्यास न संकोचता येण्यास श्री. हाशमशेठ यांनी सांगीतले.मी लगेच अकोल्याला जावून परिक्षेचा फॉर्म भरला.

श्री.हरीभाऊंच्या आणि श्री. शंकररावांच्या मळ्यात केळी ,पानकोबी , फुलगोबी , ऊस ,…इ . ची लागवड केलेली होती .आम्ही सर्वजण सुटीच्या दिवशी त्यांच्या मळ्यात कधी शाकाहारी ,कधी मांसाहारी जेवणासाठी आमंत्रीत असायचो .ते दोघेही मुळचे खानदेशातील निवासी असल्याने भाज्या अतिशय तिखट असायच्या. पहिल्याच दिवशी जेवतांना ,पहिल्याच घास घेतला , आणी अतितिखट भाजीमुळे जोराssचा ठसका लागला , इतका की ५ मिनिटे ठसका काही थांबेना .सर्वजण घाबरले . तांब्याभर पाणी पिऊन झाले , गुळाचा मोठा खडा हळुहळू खाऊन झाला . ठसका कमी झाला. नंतर माझ्यासाठी भााजी , फिक्की करून जेवणं झाली.

अन्वी मिर्झापूरला आठवडी बाजार दहीगांव – गावंडेचा बाजार , दर गुरूवारी असायचा . बाजाराची जबाबदारी माझेकडे होती . एकदा मी एकटाच दहिगांव -गावंडेला बाजारासाठी गेलो . बाजारातून निघतांना ऊशीरच झाला . सायकलवरून येतांना रस्त्यातच अंघार झाला . शेतीतून येतांना लागलेली पाऊलवाट चुकली , नी मी शेतातल्या उभ्या पिकात कधी शिरलेा ते कळलेच नाही . मी सायकल हातात घेऊन गावातल्या चक्कीच्या डिझेल इंजिनाच्या आवाजाच्या दिशेने जायला लागलो गांवाच्या बाहेर असलेल्या उकिरड्यावर उतरलो ते दिसलेच नाही , कारण जवळ बँटरी नव्हती ना ! कसातरी घरी पोहोतलो , सर्वजण चिंताक्रांत होऊन काळजी करीत होते .

बोरगांव-मंजू रेल्वे स्टेशन अगदी लहान आहे , तेथे एक्सप्रेस , मेल ,गाड्या थांबत नाहीत , पँसेंजर गाड्या थांबतात .प्लँटफॉर्म नाहीत , अन्वी -मिर्झीपूरला जाणारे रेल्वे-प्रवासी रेल्वे डब्याच्या पायर्या वरून उतरतात . बोरगांव बस स्टेशन पासून रेल्वे स्टेेशन ,४ मैल अंतरावर आहे . पँसेंजर गाडी रात्री ९ वाजता बोरगांवला येते. एकदा मीअकोल्याहून निघालो , गाडीत श्री. बायस्कर गुरूजी भेटले ,१५ मिनिटांत बोरगांव रेल्वे स्टेशन येते , त्यामुळे आम्ही दोघेही दरवाज्याजवळ थांबलो होतो. गाडी फक्त २ मिनिटे थांबते , श्री . बायस्करगुरूजी प्रथम उतरले , मी माझी कपडे असलेले थैली त्यांच्याजवळ दिली , पण मी उतरण्यापूर्वीच गाडी सुरू झाल्याने , नाईलाजाने पुढच्या काटेपूर्णा स्टेशनवर उतरलो . थंडी होती ,जवळ कपडे नाहीत , पैसे नाहीत, परत जायला गाडी नाही.काटेपुर्णा रेल्वे स्टेशनवरून ३ मैलावर कुरणखेड गांव आहे . रस्त्यावर दिवे नाहीत . रात्री २-४ च प्रवासी रेल्वेने येतात .काटेपूर्णा स्टेशन मास्तरांनी मला तिकीट विचारले , मी त्यांना सत्य परिस्थिती सांगीतली . मला स्टेशन मास्तरांनी ,त्यांच्या घरी बरेच पाहुणेआले असल्याने , घरी नेणे शक्य नव्हते . मी ऑफीस बाहेरच रात्रभर थांबलो .सकाळी गांवात पोहेचलो. योगायोगाने कुरणखेड मराठी माध्यमिक शाळेवर माझे अन्वी मिर्झापूरहून बदलीने स्थानांतरण झाल्याचे आदेश आले होते . तेथील मुख्याध्यापकांना मी जावून भेटलो . त्यांचेकडून तात्पुरते उसने पैसे घेऊन मोटार-गाडीने बोरगांव मार्गाने अन्वी मिर्झापूरला पोहोचलो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)