मुक्काम कुरणखेड/काटेपूर्णा

अन्वी -मिर्झापूरहून स्थानांतरणाने , माझी बदली कुरणखेड/काटेपूर्णा ,पंचायत समिती ,अकोला येथे करण्यात आली . अकोला -मुर्तिजापूर रोडवर २० मैलावर कुरणखेड हे गांव आहे . गांवाजवळ काटेपूर्णा नदीच्या काठावर अतिपुरातन असे देवीचे देऊळ आहे .येथे जुन्या कुरणखेड जवळ मूर्तिजापूर रोडवर कोळंबी गांवाच्या अलिकडे नवीन कुरणखेड वसविलेले आहे . येथील शाळा नदीकाठावरच टेकडीवर आहे .येथील जि.प.मराठी माध्यमिक शाळा ,दुबार पध्दतिने भरायची ,वर्ग १ ते ४ सकाळी तर वर्ग ५ ते ७ दुपारी भरविले जात. येथील मुख्याध्यापक , अकोल्याजवळच्या उगवा या गावाचे , श्री .देशमुख आप्पा होते . श्री.लोनसने गुरूजी शेगांव जवळच्या पातूर्डयाचे ,अकोल्याचे डॉ.कुळकर्णी गुरूजी , नवीन कुरणखेडमध्ये राहणारे श्री.नानोटी गुरूजी ,श्री. ओवे गरूजी तर जुन्या कुरणखेडमधील श्री. जामोदेगुरूजी ,श्री.छत्रपालसिंह राजपूत , श्रीमती जोशीबाई ,श्रीमती कस्तुरेबाई , श्री. जेाशी गुरूजी ,श्रीमती अलका देशमुखबाई श्रीमती नानेोटीबाई….इ. शिक्षकवृंद होता . मी कामावर रूजू झालो .येथे सुध्दा मी वयाने सर्वात लहान होतो . मला नवीन कुरणखेड गावात श्री. शंकर कुंभाराची खोली भाड्याने मिळाली .समोरच्या खोलीत अकोल्याजवळच्या डोंगरगांवचे डॉक्टर श्री .देशमुख होते .माझे ह्यासगळ्यांबरोबर छानच जमले होते .डॉक्टर देशमुखांचे काका श्री.भाऊसाहेब देशमुख स्वातंत्र्य-सैनिक होते . त्यांचे मोठे भाऊ डोंगरगांवचे सरपंच होते, मधले भाऊ मुंबईला विक्रीकर खात्यात , विक्रीकर निरीक्षक , पदावर कार्यरत होते ,सगळ्यात लहान भाऊ बाळासाहेब कृषिखात्यात ,पंजाबराव कृषी विद्यापीठात नोकरीला होते .मी डोंगरगांवला त्यांच्या घरी मधून मधून जात असे . श्रीमती नानोटी बाईंच्या भावाची अकोल्याला , श्री. विजय ईंडस्ट्री नावाचा कारखाना होता . श्री.नानोटी गुरूजींचे मोठे भाऊ , पंचक्रोशीत प्रसिध्द व नावाजलेले श्री. नानासाहेब , प्रसिध्द वैद्य होते . पुतण्याही मुर्तिजापूरला डॉक्टर होता .श्री.नानोटी गुरूजींच्या वाड्यात डॉ. कुळकर्णी गुरूजीही राहत.त्यांच्या घराजवळच मलेरीया खात्यातील श्री.देशमुख तसेच बांधकाम खात्यात काम करणारे श्री. काळे साहेब राहात होते. माझे नवीनच झालेले मित्र श्री.शंकरराव बोळे आमच्या घरा जवळच राहात .ह्या सर्वांशी माझी चांगली गट्टी जमली होती.

शाळेत तर सर्व शिक्षकवृंद , विद्यार्थांचा मी आवडता गुरूजी झालेलो होतो. सकाळीच शाळेत गेलो की मला मुख्याध्यापक श्री. देशमुख. गुरूजींच्या आदेशाप्रमाणे प्रार्थनेला पी. टी.आय. म्हणून हजर असायचो . नंतर शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी , वर्ग ४ तसेच वर्ग ७ च्या विद्यार्थ्यांचे विषेश वर्ग घेई . त्यानंतर शाळेचे विविध अहवालाचे काम करण्याची जबाबदारीही माझेवरच दिली गेली . शाळेच्या वरच्या वाड्यात श्री.देशमुख आप्पा , श्री. जोशी गरूजी , श्री. जामेादे गुरूजी तसेच श्रीमती जोशीबाई राहात . माझी जेवणाची , दुपारच्या चहाची सोयग वरच्या वाड्यातच असे , बोलवायचे मुख्याध्यापक पण बहुतांशी श्रीमती जोशी बाईंनाच चहा करायला सांगीतले जायचे .श्रीमती जोशीबाईंना स्वयंपाकही फारसा येत नव्हता मुख्याध्यापक श्री. देशमुख आणी इतर शिक्षक श्रीमती जोशीबाईंची मधूनमधून फिरकी घेत असत. एका प्रकारे जोशी बाईंचे कम्पलसरी ट्रेनिंग सुरू होते . मी गहू दळण्यासाठी आणलेली पिशवी सकाळीच ,माझ्या सायकल वरून अदृुश्य व्हायची . दुपारी घरी जातांना त्या पिशवीत गव्हाचे पीठअसायचे .

गावाच्या सरपंच श्रीमती देशमुखबाई होत्या . त्यांचे मोठे दिर श्री. जे . वाय,. देशमुखसाहेब जिल्हा परिषद, अकोलाचे , मुख्य कार्यकारी अधिकारी , म्हणून कार्यरत होते . मुंबई – कलकत्ता व्हाया नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरच कुरणखेड हे गांव होते . बव्हंशी शासकीय / निमशासकीय कार्यालयाचे अघिकारी, कर्मचारी कुरणखेडलाच मुख्यालयी राहत होते . डॉ. देशमुख होमिओपँथीची औषधे देत असत .त्यांच्या अकोल्याच्या होमिओपँथी कॉलेजचे , प्राचार्य ,डॉक्टर श्रॉफ होते . त्यांना मी माझ्या लहानपणापासून चांगले ओळखत होतो . अत्यंत हुषार आणि निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची प्रसिध्दी होती . ते ति . मोठे मामांच्या घरी कौटुम्बीक संबंध असल्याने नेहमीच येत असत . मी आणि लहान मामांची मीठ खाण्याची जणू शर्यतच लागायची . डॉक्टर श्रॉंफांची औषध घेतल्या नंतर आमची अति मीठ खाण्याची सवय बंद झाली होती .
एकदा कधी नव्हे त्यावेळी नवीन कुरणखेडमधील कादर नांवाच्या मुलाला कुळकर्णीसरांच्या सायकलवर घेऊन शाळेत आणत होतो . अचानक त्या मुलाचा एक पाय सायकलमधे पुढच्या चाकात गेला , सायकलच्या पुढच्या चाकाचे ७-८ स्पोक तुटले,कादरचा पाय रक्ताळला गेला. मी त्याला घेऊन शाळेजवळच्या डॉक्टर देशमुखांकडे घेऊन गेलो . त्यांनी कादर खानच्या पायाला मलमपट्टी करून दिली .औषधीही दिली . मी कादरला घेऊन ,त्याच्या घरी पोहेाचविले . सायकल श्री. कुळकर्णी सरांसोबत अकोल्याला नेऊन दुरूस्त करून दिली

नवीन कुरणखेड गावात माझे मित्रमंडळात श्री. वामनराव बोळे , नाटकवाले सप्रे कुटुंबीय कधी सामील झाले ,कळलेच नाही. श्री. नानोटी गुरूजींचा मित्रपरिवार खुप मोठा होता. ते स्वत: ” पाणी रे पाणी तेरा रंग कैसाss , जिसमे मिलाए वैसा ,” ह्या म्हणीप्रमाणे सब गुणी मौला सारखे होते .सर्व बरे-वाईट गुणसंपन्न तसेच आधुनीक विचाराचे होते. कमलपत्राप्रमाणे चिखलातील पाण्यात राहूनही पाण्याचा थेंबही धरून ठेवायचे नाहीत . त्यांचे आयुष्यातील गमतीजमती ते लहर आली तर खूप रंगवून सांगत .त्यांच्या मते नवीन पिढीने बरे वाईट अनुभव स्वत: घेऊन आधुनिक विचाराने असे का ? कसे ? कधी ? स्वत: निर्णय घेणे आवश्यक आहे . सप्रे कुटुंबीयातील सगळे सदस्य ,अगदी ६ व्या वर्गात शिकणार्या मुलीसह नाटकात काम करीत . त्यासाठी ते सर्वजण गावोगावी फिरत . मलेरीया सुपरवायझर श्री. देशमुखांचा सप्रे कुटुंबीयांशी घरोब्याचे संबंध होते.

कुरणखेडला आमचा ग्रुप चांगलाच जमला होता .शाळेतील श्री. छत्रपालसिंह राजपूत सरांनी आम्हा सर्व शिक्षकांना वर्धा राष्ट्रभाषा प्रवीण , हिंदी परिक्षेला बसविले होते. आमच्या कुरणखेड केंद्रातील ८०% शिक्षक ऊत्तीर्ण झाले होते.मी कुरणखेड केंद्रात प्रथम आलो होतो . त्यानिमित्ताने गेट-टुगेदर पार्टीत इतर सर्व शिक्षक-शिक्षिकाही सामील झाल्या होत्या . एकंदरीत सर्वत्र अत्यंत खेळीमेळीचे व सलोख्याचे वातावरण तयार झाले होते . मला ह्यातून नवनवीन गोष्टी , अनुभवातून शिकायला मिळाले .

सर्व शिक्षकांनी मिळून दर महिन्यात प्रत्येकी १० रूपये प्रमाणे भि .सी . सुरू केली होती . परतफेड १० रूपये अतिरीक्त प्रमाणे करून तात्पुरते कर्ज घेण्याची सोयही करण्यात आली होती.

नवीन कुरणखेड जुन्या गावापासून दोन मैलावर होते. गांवातील घरे लांब लांब अंतरावर होती .त्यामुळे मधून मधून चोरीचे प्रकार होत . दिवाळी जवळच आली असल्याने घरोघरी गोड-धोड पदार्थ जसे लाडू , करंजी , अनारसे तसेच चकली ,शेव …..इ. तयार करण्यात येत होते . श्री . नानोटी गुरूजींचे घर म्हणजे एक मोठा दुमजली वाडाच होता. वरच्या मजल्यावर खोल्या काढलेल्या होत्या .खालच्या भागात स्वयंपाक-घर ,कोठी-घर ,वैद्य नानासाहेबांचा चार खोल्यांचा प्रशस्त दवाखाना होता , अत्यवस्थ रोग्यांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तीन खोल्या राखून ठेवण्यात आल्या होत्या .स्वयंपाक-घराच्या लागूनच नानोटींच्या वृध्द मातोश्रींची झोपण्याची खोली होती . झोपण्याच्या पलंगाजवळ हवेसाठी मोठी खिडकी होती .

दिवाळी पंधरा दिवसांवर आलेली असल्याने सगळ्या गृहिणींची वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची लगबग जोरात होती .रात्री उशीरापर्यंत जागरणं होत असत . अंथरूणावर पाठ टेकल्या-टेकल्या कोणाला कधी झोप लागली हे समजले नाही .सर्वांना गाढ झोपा लागल्या . लहान आवाजाने झोपमोड होणार नव्हती . ह्याऊलट वृध्द मातोश्रींची झोप मात्र जागृत होती . एकदा मध्यरात्रीनंतर ४ – ५ चोर खिडकिचे गज वाकवून मातोश्रींच्या खोलीत शिरले . चोरांना वाटलं म्हातारी गाढ झोपलेली असेल .म्हातारीला ओलांडून चोर आत शिरले . म्हातारीने प्रसंगओळखला . अंधार असल्याने एका चोराचा पाय म्हातारीला लागल्याचे त्याच्या लक्षात आले नाही.एका चोराने स्वयंपाक घर शोधलं , इतरांना स्पर्शाने मागोमाग बोलावले , सगळ्यांना बनविलेल्या पदार्थांच्या ताज्या वासाने आपल्याला प्रचंड भुक लागल्याची जाणीव झाली . तेवढ्यात म्हातारीचा झोपेतच बरळल्यासारखा आवाज आला , ”पोट भरून खा s s रे s s बाबांनो , आवाज जास्त करू नका , घरातले इतर लोक जागे होतील नाही ss तर . चोरांना वाटलं ,आपल्यापैकीच कोणीतरी बोललं असेल ! सगळ्या चोरांनी पोटाला तडस लागे पर्यंत खाल्लं ! ! आधीच तेलकट , तुपकट , त्यातच गोsड गोsड चव मग सर्वजणांवर निद्रादेवी अति s च प्रसन्न झाली . सगळ्यांना अगदि -गा s s ढ झोपा लागल्या . पहाट झाली , सर्व गृहिणी लगबगीने उठल्या , स्नानादी आटोपून त्यापैकी दोघीजणी स्वयंपाक घराजवळ आल्या , बघतात तो काय ? दरवाजा सता s ड उघडा , नी सगळे चोर गा s ढ झोपलेले .

पुरूष मंडळींना उठविण्यात आले . स्वयंपाक – घराच्या दाराची कडी बाहेरून लावून पोलीसांना पाचारण करण्यात आले . पंचनामा करायचा , तर चोरीला काय काय गेले ? कोणालाही सांगता आले नाही . शेवटी पोलीस चोरांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले . तेथे जुन्या गावात श्रीमती अलका देशमुखबाईंच्या घरी तिसर्या मजल्यावर चोरी झाल्याची तक्रार घेऊन आल्या होत्या . चोरांनी साखर , चहा ,
तुर-डाळ पळविली होती .

मी आणि डॉक्टर देशमुख शंकर कुंभाराच्या खोलीत समोरासमोर राहात होतो .आमच्या दोन्ही खोल्यात बरेच वेळा रात्री सर्वत्र काळ्या मुंग्या निघत . ह्या मुंग्या कोठून येत कधीही समजले नाही . खोलीच्या सगळ्या भिंती ,छत , खाली फरशीवर , जणूं काही आच्छादनच ( cover ) केले आहे ,असे कोणालाही वाटे .सकाळी मात्र अचानकपणे जशा येत तशाच अंतर्धान पावत . परिणामी आम्हा दोघांनाही खोलीच्या बाहेर व्हरांड्यात पथारी पसरून निद्रादेवीची आळवणी करावी लागे .

मला नवीन कुरणखेडमधील दुधवालीच्या पाचवीतील मुलीची शिकवणी घ्यावी लागली होती . सकाळी मी चहा , नाश्ता , जेवण …..इ. ची तयारी करतां करता त्या मुलीची शिकवणी घेत असे . गुढी-पाडव्याचा दिवस होता , मी सर्वांना surprise करायचे असा विचार केला . मी एकटाच राहात होतो .वर्षारंभिचा पहिलाच सण म्हणून पुरणपोळी करायच ठरविले . माझ्याकडे वातीचा स्टोव्ह होता. दुकानदाराकडून आणलेले रॉकेल तेल स्टोव्हमध्ये पूर्ण भरलेले होते . हरबर्याची डाळ लहान पातेल्यात टाकली ,पाणी घालून डाळ शिजायला टाकली . मला वाटले दहा पंधरा मिनिटांत डाळ शिजेल ,पाहतो तर स्टोव्ह विझला होता . वाती जळून गेल्या होत्या ,पातेल्यातील पाणी संपले होते . स्टोव्हच्या वाती वर सरकऊन पुन्हा पातेल्यात थंड पाणी घालून डाळ शिजायला ठेवली. थोड्याच वेळात स्टोव्ह वुिझला . रॉकेल तर पुर्ण भरलेले होते . मग स्टोव्ह का विझला ? कारण समजेना .
तेवढ्यात दुधवालीबाई मुलगी घरी यायला उशीर कां झाला ? पाहायला आली . स्टोव्हवर पातेले , मी विचारात ? त्या बाईंनी डाळ शिजली .काय ? पहायला पातेल्याचे झाकण काढले . तिच्या लक्षात सर्व प्रकार आला . डाळ शिजली नाही , तर बठ्रठरली आहे ., कधीही शिजणार नाही . तिने विचारले गुरूजी पुरण-पोळीचा बेत आहे वाटते ! ! पण डाळ वाटणार कशावर ? मी ही डाळ घेऊन जाते . पुरण पोळ्या पाठवून देते . माझ्या तसेच डॉक्टर देशमुखांच्याही लक्षात
आले की, रॉकेलमध्ये पाणीच जास्त आहे . आम्ही दोघेही दुकानदाराकडे गेलो . त्याने झालेली चूक कबूल केली , पुन्हा भेसळ नसलेले रॉकेल दोन लिटर दिले व पुढे प्रकरण नेऊ नका अशी विनंती केली .

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी गावातून काढण्यात आली . प्रत्येक शिक्षक आपापल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसोबत होते , मी शाळेचा पि . टि . आय . असल्याने माझ्या हातात निर्गुडीचा फोक छडीसारखा होता . संपूर्ण प्रभात फेरी अगदी शिस्तीत , घोषणा देत , हातात घोषणांचे फलक घेऊन , बँडच्या तालावर कुरणखेड गावाच्या मुख्य रस्त्यावरून जात होती . ग्रामपंचायतच्या मैदानात आपल्या देशाचा मानबींदू असलेल्या तिरंगी झेंडा फडकविण्यात आला . झेंडावंदन , राष्ट्रगीत , सरपंच श्रीमती देशमुखबाईंचे , तसेच मुख्याध्यापक श्री . आप्पा देशमुख , गावातील प्रतिष्ठितांची थोडक्यात भाषणे झाली. मुलांना खाऊ म्हणून छान आंबटगोड गोळ्या वाटण्यात आल्या .

वर्ष संपत आले , शाळेच्या परिक्षा झाल्या , निकालही जाहीर झाले . उन्हाळ्याच्या सुट्या लागणार होत्या . मी अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक तोही जादा शिक्षक असल्याने १ मे पासून सेवेतून कमी करण्यात आले .अकोला जिल्हा परिषदेतील सर्वच अप्रशिक्षीत प्राथमिक शिक्षकांना कमी करण्यात आले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)