मुक्काम उमरवाडी

उमरवाडी हे गांव अकोला-वाशीम रोडवर मेडशी गट ग्रामपंचायत अंतर्गत ,मेडशी गावापासून ३ मैलावर आहे .गांवाची लोकसंख्या अवघी ४०० होती .बहुतांशी आंध
समाजाचे गांव ,मेडशी गट ग्रामपंचायतचा सरपंच-पदाचा मान उमरवाडीच्याच श्रीमान कोंडजी धंदरे यांनाच मिळाला होता .  उमरवाडीची शाळा गावाच्या सुरवातीलाच एका खोलीच्या पक्या ईमारतीत  भरत असे . ही शाळा एक शिक्षकी होती . येथे पहिली , दुसरी व तिसरी असे  ३ वर्ग असले तरी तिनही वर्गासाठी शिक्षक मात्र एकच असायचा .पहिलीत १० विद्यार्थी , दुसरीत  ७ विद्यार्थी तर तिसरीत  ५  विद्यार्थी होते . एका पट्टीवर पहिलीचे , दुसर्या व तिसर्या पट्टीवर अनुक्रमे दुसरी व तिसरीचे विद्यार्थी बसत .

मी उमरवाडी येथे रूजू होण्यासाठी प्रथम पंचायत समिती , मालेगांव येथे शिक्षण विभागात गेलो . तेथे संवर्गअधिकारी पदावर श्री . प्रचंडसाहेब होते , पंचायतषक समिती शिक्षणाधिकारी श्री . कविश्वरसाहेबांनागही भेटलो . त्यांच्या लेखी आदेशाप्रमाणे उमरवाडीला जाऊन कामावर रूजू झालो . तसा अहवाल पंचाायत समितीला पाठविला . शाळा समितीतील सर्व सभासदांशी ओळख करून घेतली . सरपंच श्री. कोंडजी धंदरे हे शाळा समितीचे पदसिध्द अध्यक्ष होते . इतर सदस्यांपैकी वयोवृध्द श्री . देवरामपाटील हे माझ्या आज ही स्मरणांत आहेत . त्यांनी गावात घरोघरी माझ्यासोबत फिरून शाळेची पटसंख्या जवळ जवळ ७५ पर्यंत वाढविणेसाठी मोलाची मदत केली होती .

उमरवाडी गांव साक्षर करणेबाबत जिल्हा परिषद , अकोला तसेच पंचायत समिती , मालेगांव यांच्या अधिकारी ,ग्रामपंचायत मेडशीचे सरपंच व पदाधिकारी यांचे मार्गदर्शनाप्रमाणे प्रौढ साक्षरता कार्यक्रम राबविण्यात आला . मेडशी उच्च प्राथमिक शाळेमधील सर्व शिक्षक , शिक्षिका , विद्यार्थी यांचे तसेच आजूबाजूच्या कोळदरा , काळाकामठा , वाकळवाडी …इ . गावच्या साक्षरता साठी तेथील , शिक्षकांनी खूप सहकार्य केले . ह्या सर्व गावांचा एकत्रीत ”साक्षरता गौरव ” समारंभ सर्वानुमते उमरवाडीलाच घ्यायचे निश्चीत झाले . सभापति , पं . स . मालेगांव , संवर्ग विकास अधिकारी , शिक्षणाधिकारी तसेच उपशिक्षणाधिकारी ,सरपंच , मेडशी गट ग्रामपंचायत , तसेच त्या त्या गांवचे शिक्षकवर्ग व समस्त गांवकरी मंडळीं ह्या सर्वांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले . अविस्मरणीय असा ” ग्राम साक्षरता गौरव” समारंभ साजरा झाला. ह्याचा अहवाल मालेगांव पंचायतसमिति ,तसेच अकोला जिल्हा परिषदेलाही पाठविणेत आला .

एकदा उमरवाडी शाळेच्या मागील झोपड्यांना सकाळी १० वाजता आग लागली होती .बघता बघता आग सगळ्या गांवात पसरायला सुरवात झाली . मी शाळेत पोहोचतो तो आग लागलेली . गांवातील तरूण पुरूष ,बायका , मुले …. सगळे गावाबाहेर शेतात काम करायला गेलेले होते . गांवात फक्त म्हातारी मंडळी होती , नी शाळेतील १०_१५ विद्यार्थी . पाहता पाहता आग डोंब उसळला . आगीचे लेाळ. दिसताच जवळपासचे लोक धाऊन यायला सुरवात झाली .मी सर्वप्रथम गांवातील एकमेव विहिरीपासून आग लागलेल्या भागाकडे दोन रांगा वआग न लागलेल्या भागाकडे अशा तीन रांगा तून लोकांना उभे केले . विहिरीतून पाणी काढून देणारी मंडळी ,बादली , गुंड …इ .भरून देऊ लागली . आग लागलेल्या भागावर सतत पाणी टाकू न आग पसरून देता , नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सरू केले .तर दुसरीकडे आगीच्या भक्षस्थानी पडू शकणाऱ्या जवळच्या झोपड्या पाडायला सुरूवात केली .थोडक्यात आग पसरणार नाही ह्याची खबरदारी घेणे सुरू केले . त्याचवेळी ४ मैलावरील मेडशी पोलीस स्टेशन तसेच मेडशी प्राथमिक शाळा , हायस्कुल ,ग्राम पंचायत मेडशी ह्यांना सूचना देण्यासाठी माणसे पाठविली . आजूबाजूच्या शेतातील , गावातील माणसेही मदतीला आली . एव्हढी मोठी आग प्रथमच लागली होती . आग दुपारी चार वाजता आटोक्यात आली .

गावातील एकमेव पक्या ईमारतीत शाळेच्या खोलीत ,आग पिडीतांची खाणे – पिणे व राहण्याची सोय करणेत आली .चोहो बाजूंनी यथाशक्ती खाण्यासाठी , धन – धान्य , कपडे , औषधी ….इ. चा ओघ सुरू झाला . पोलीसही आले . फायर बिग्रेडचीही गाडी आली . त्यादरम्यान शाळा समोरच्याच मोठ्या पिंपळाखाली भरविण्याची व्यवस्था करणेत आली .

एके दिवशी मला मालेगांव पंचायत समिती मधून निरोप आला . मला तांतडीने जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी , अकोला ह्यांचे कार्यालयात उपस्थित राहावयाचेआहे .मी लगेच अकोला जिल्हा परिषद ,शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात हजर झालो . तेथे आमचे अध्यापक विद्यालयातील इंग्रजीचे सर्व प्राध्यापक मला भेटले . शिक्षण संचालक , पुणे यांचा दौरा आयोजित करण्यांत आला असून ,त्यांना १९६५-६६ मध्ये इंग्रजी विषय घेऊन प्राविण्याने उत्तीर्ण झालेले शिक्षक त्यांच्या शाळेत वर्ग ५- ६ -७ मधील विद्यार्थ्यांना इंग्रजी कसे शिकवितात ह्याचे निरिक्षण करावयाचे आहे .
मी अध्यापक विद्यालयात इंग्रजी विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो . त्यामुळे सर्वांचे लक्ष माझेवरच केन्द्रीत झाले नसते तर नवलच घडले असते . पण येथे वेगळाच घोळ झाला होता . अकोला जि. प. शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे माझी नियुक्ति एक शिक्षकी शाळेवर करण्यात आली होती . तेथे मी वर्ग ५_ ६ _७ नव्हे तर वर्ग १_२_३ ला शिकवित होतो .तेथे मला इंग्रजी विषय शिकविणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नव्हते . जि . प . शिक्षण विभाग तीन दिवसात माझी बदली जवळच्या मोठ्या शाळेवर करू शकत नव्हता . ह्या पेचप्रसंगातून सुरक्षीत मार्ग कसा काढावा ? मेडशी शाळेत ५_६_७ वर्गावर इंग्रजी शिकविले तर शिक्षण संचालकांचा त्याबाबतचा अभिप्राय , श्री .लोणकरांनी शिकविले तरी , मेडशी शाळेला मिळेल . सरते शेवटी सर्वानुमते शिक्षण संचालकांचा दौरा पुढील वर्षी घेण्यासाठी प्रयत्न करावेतअसा निर्णय घेण्यात आला . पुढील शैक्षणिक वर्षात माझी बदली मेडशी उच्च् प्राथमिक शाळेवर करण्यात आली,आश्वासन पुर्ति करण्यातआली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)