माझे गाव – 2

शेगांव एस टी स्टॅन्ड्वरुन भोनगाव एस टी ने सकाळी आठ वाजता भोनला जाता येते. जुन्या काळी ह्याच जागेवरून छोट्या मोटार गाड्या जात होत्या. येथून टुनकि, बावनबीर, पातुर्डा, मनसगाव असे ओरडुन प्रवासी जमवणारे कमिशन एजन्ट श्री वामनराव (काळी टोपी वाले) मला आजही आठवतात. लहान पिवळ्या काळया गाड्यांतुन त्या काळी मनसगावाला जाता येत होतं. आता भोनगाव एस टी ने नवीन खातखेड फाट्यावर ऊतरावे लागते. हे नवीन खातखेड १९५९ च्या महापूरा नंतर वसविण्यात आले आहे. साधारणपणे ३ किलोमीटीर अंतरावर पूर्णा नदीच्या पलीकड्च्या तीरावर ऊंच टेकडीवर भोन हे गाव वसलेले आहे. अलीकड्च्या काठावर “भोनगाव” वसलेले आहे. नदीला साधारणपणे मांड्या इतके पाणी असते. त्यातुन चालत पलीकडे जाता येते.

पूर्वी शेगाव वरुन टुनकि-मनसगाव -पहुरपुर्णा मार्गे भोनला जाताना पूर्णा नदीतून जावे लागायचे. तेथे पूर्णा नदीचे पात्र जास्त रूंद नसले तरी नदी काठ ऊंच आहे. कमरे एवढ्या पाण्यातुन वर गेल्यावर शेतातील पाउल- वाटेने जातांना ऊजव्या बाजुला शिवमन्दिर आहे . हे शिवमन्दिर अतिपुरातन आहे. येथे राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ श्रुंग ऋषिच्या अधिपत्याखालि केल्याचा ऊल्लेख पयोश्नि माहात्म्य ग्रंथात आहे. ज्या ठिकाणी नदी पूर्व वाहिनी होते, ते ठिकाण अत्यंत पवित्र तीर्थ क्षेत्र मानतात. ह्याच ठिकाणि सर्वात ऊंच टेकडीवर भोन हे गाव वसलेले आहे.ह्याच गावात लोणकर-सोनार फार पुर्वीपासून राहतात.

सुवर्णकार/सोनार मुळचे मालवा प्रांतातून भारतात विविध भागात – महाराष्ट्र, मध्यप्रांत, गुजराथ, बंगाल, ऊत्तर भारत ……इत्यादी, ठिकाणी गेले. उज्जैन जवळ “आशापूरा देवी” हे सुवर्णकारांचे कुलदैवत आहे असे पूर्वीच्या काळात भाट येऊन सांगत. त्यांच्या बाडात प्रत्येक घराण्यातील वंशव्रुक्षाची इथंभूत माहिती असते. गावो गावी घरो घरी जाउन ते अद्यावत महिती नोंदउन ठेवण्याचे काम करित.त्या साठी त्यांचा यथा योग्य सत्कार करून दान दक्षिणा दिली जात असे. सुवर्णकारातही ईतराप्रमाणे साडेबारा पोटजाती आहेत. विभाग / प्रान्त ह्यानुसार श्री माळवी/माळवी / दैवज्ञ / झाडे / कावळे / पांचाळ – ईत्यादी सोनारात आडनावे अनेक आहेत – लोणकर, पिंजरकर, ठोसर, साल्फळे, शहाणे, काटोले, बुटे, बुटी, तळोकार, हिंगणेकर, खिरोळकर, विंचुरकर, रत्नपारखी, ऊम्बरकर,सालफळे…… इत्यादी.

ह्यापैकि भोन ह्या गावात लोणकर घराणे पूर्वापार नांदत आले आहे. आजोबा श्रीमान बळीरामपंतांचे वडिल श्री सितारामपंत आपल्या चार भावंडांना घेऊन ह्या गावात आले होते . माझ्या वडीलांचे मामा बाळक्रुश्ण सालफळे नागपुरला बडे प्रस्थ होते. त्यावेळि सरदार भोसले सरकाराच्या दरबारात त्यांचे बरेच वजन होते.आजहि सिताबर्डी किल्यात भोसलेंचा वाडा आहे. त्यांच्या दरबारात.सालफळे आजोबांचे जाणेयेणे होते. त्याकाळी विदर्भातील जवळजवळ प्रत्येक घराण्यातिल किमान एक माणुस सालफळे आजोबाजवळ पाहिजे ते शिकण्यास जात असे.ते त्यावेळचे गुरुकुलच झाले होते. चारही भावंडे नागपूरला सालफळे मामांकडे शिकायला गेले. परन्तु माझे वडिलांचे मन नागपुरला रमले नाहि.ते भोनला परत आले.शिम्पिकाम करु लागले. सोनारकामात लक्ष दिले नाहि. त्यांचे लग्न आकोल्याचे हिंगणेकर घराण्यातिल कनिश्ट कन्या कु. प्रभावतिबाईशि झाले.त्यावेळी गावातील सगळे नदिवरुन पाणी भरत. कारण भोन हे गाव् खारेपाणि पट्यात् होते.लोणकर घराणे त्याकाळी सम्पन्न होते. एकत्र कुटुम्ब होते, शेतीत घरातील सगळे काम करीत, त्यामुळे भरपुर पिक येत असे. गाई, म्हशी असल्याने दुधदुभतेही भरपुर होते.

त्यावेळी गावात बळीरामपंत, नरहरिपंत, अम्बादासपंत, रामदासपंत, शंकरराव लोणकर राहत होते. रामचंद्र, सदाशिव आणी वामनराव ही बळीरामपंतांचि मुले, नरहरिंचा नारायण, शंकररावांचा भिकाजि व रामभाउ ही दोन मुले, सगळे एकत्र राहात. कालान्तराने वेगवेगळे राहु लागले.शेताचेहि भाग झाले. आपआपलि शेति कसायला लागले.उत्पन्नाचेहि भाग झाले.त्यात दुश्काळ पडला.गावातील गुरे जनावरे चारा खायला नसल्याने कावरलि. खंगुन खंगुन मरायला लागली. जमिनिखालिल पेवातिल धान्य खाणं सुरु झाले.पुरवुन पुरवुन तेहि संपायला आले. गावाच्या तिनहि बाजुला पुर्णा नदि असल्याने पाणी प्यायला होते. हेच माझ्या जन्माचे साल ,ह्याचा शोध मला माझ्या वयाच्या पन्नाशिनंतर लागला.

गावाच्या टेकडिवरुन खालि उतरुन पाण्याचा गुंड कमरेवर नी खांदयावर धुतलेले कपडे घेउन पुन्हा टेकडीवरुन घरी यावे लागे. त्या दिवसात एकदा ति. सौ.आई नदीवरुन पाणी व कपडे घेवुन घरी येत होती. तिच्या मागुन कावरलेली वेडी म्हैस ओरडत येत होती.गावातुन नदीवर येत असलेल्या माणसाने ते पाहिले.त्याने लगेच ति.आईला बाजुला ढकलले.ति.आई, पाणी -गुंड ,कपडे बाजुला खड्यात पडले. ति.आई कशीतरी घरी आली. नंतरच्याच आठ्वड्यात माझा जन्म झाला म्हणतात. नेमकी तारीख कोणालाच माहिती नाही. पंचक्रोशीतुन मला बघण्यास खुप लोक येत, कारण माझे डोके हनुमानासाररवे लांबट होते, हळुहळु ते सामान्य झाले. आमचे घर गावाच्या मध्यभागी होते, आजही आहे. वरच्या भागात बहुतांशी पाटील मंडळी राहत. बाजुच्या भागात हनुमानाचे मंदीर आहे. त्याच्या मागे बाजीराव पाटलांचा (जुने पटवारी) वाडा, नंतर ग्रामदेवीचे लहानसे मंदीर आहे. समोर शाळा, ग्रामपंचायत, डावा रस्ता नदीकडे तर उजवा रस्ता वरवट-बकालला जातो. गावाला जाण्या येण्यास फक्त हाच रस्ता आहे. की तिनही बाजुला पुर्णा नदी आहे. आमच्या घरासमोर किराणा दुकान होते.त्याचे मालक दुर्गादास मारवाडी होते. त्यांना सर्वजण आजोबा-आबा म्हणत असत. त्यांच्या पत्नीला जिजी म्हणत असत. त्यांच्याशी आमचे घरोब्याचे संबंध होते.

त्यावेळी लोणकर कुटूंब एकत्रच होते, आर्थिक परिस्थितीही संपन्न होती. माझ्या जन्मानंतर थोड्याच महिन्यात सर्वजण वेगवेगळे राहु लागले. आजी आमच्यासोबत राहायची. आजीला माझा खुपच लळा होता. घरी गाय-वासरु होते. माझ्या दोनही काकांच्या तुलनेत आमची आर्थिक परिस्थिती खुपच बेताची होती. वडिलांच्या मजुरितून आठवड्याचा खर्च कसाबसा चालायचा. दररोज फक्त तीन भाकरी ज्वारीच्या तयार करायच्या, त्यातील अर्धी माझी असायची.

श्री. सदाशिवकाका आणि बाबा मिळून एका घराचे दोन भागापैकी एका भागांत आम्ही तिघे बाबा , आई व मी राहात होतो .आमच्या घरात माडीवर आमचे स्वयंपाक घर होते . एकदा मी माडीवरच झोळीच्या पाळण्यात झोपलो होतो . मला पाळण्यात झेापऊन आई नदीवरून पाणी आणायला गेली होती . मी त्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर झोपेतून जागा झालो .मला आजूबाजूला आई दिसली नाही . पाळणयातून बाहेर निघाण्याचे माझे प्रयत्न सुरू झाले अन् मी बाहेर आलो . रांगत रांगत मी निघालो .पुढे उतरणार्या पायर्या आहेत हे मला कळणार कसे . रांगता रांगता मी वरच्या पायरीवरून खाली कोलांट्या खात आलो . अस्मादिकांनी बोंबीच्या देठापासून भोकांड पसरून रडायला लागलो .माझे जोराचे रडणे ऐकून समोरची मारवाडी-जिजी धावत धावत खाली आमच्या घरी आली . परंतु घराला बाहेरून कडी लावलेली होती . आत माझा रडून रडून आकांत चालू होता .बाहेरची कडी काढून सौ. जिजी आत आली .मला दोन डोळ्यांच्यामध्ये खालच्या जात्यावर पडल्याने जखम झाली होती .रक्त वाहत होते . सौ.जिजीने माझ्या आईला हाकामारायला सुरवात केली. तेव्हढ्यात सौ .आई घरी आली . सौ .जिजी , सौ .आईला खूप रागावली . समोरच्या श्री. गोपाळ वैद्यांच्या उपचारानंतर माझे वाहणारे रक्त थांबले . जखम बरी झाली ,पण तेथील जखमेचा व्रण आज ७० वर्षानंतरही कायम आहे .एव्हढी गडबड/ गोंधळ झाला पण माझी मधली काकू सौ .जनाबाई मात्र मदतीला /पाहायलाही आली नाही . असो .

मी जेवणानंतर दिवसभर चुलत भावांसोबत खेळायचेा. एकदा मोठ्या काकांकडे पाहुणे आले होते, त्यांची आर्थीक परिस्थिती चांगली होती. पुरणपोळीचा पाहुणचार असावा. त्यांची मुले जेवावयाल गेली. मीहि जेवायला घरी आलो.पुन्हा खेळायला गेलो. भावंडांनी सांगितले “आम्ही पुरणपोळी खाऊन आलो”. मीही सांगीतले आमच्याही घरी पुरणाची पोळी केली! लहान मुलेच आम्ही पुन्हा खेळायला लागलो. पण मी बोललेले माझ्या आईने ऐकले होते. तिने बाबांना सांगितले, दोघांनाही खुप वाईट वाटले.पण नाईलाज होता.हेहि दिवस जाउन चांगला काळ येणारच,आहे ह्या आशेवर दिवस जात होते.माझ्या भावंडांसोबत माझी गावातील शाळा सुरु झाली.सकाळ संध्याकाळ घरी दुध आणायला बाजीराव पाट्लांच्या वाडयासमोरुन भोईवाड्यात जावे लागायचे,त्या भागात कुत्री होती ,ती माझ्या अंगावर भुंकत त्यांना मी माझ्याजवळच्या काडीने पळवायचो, न घाबरता !

आमच्या घरासमोर पर्यागकाकु व भिकाकाका राहायचे.माझा सर्वात जास्त लाड माझी आजी व पर्यागकाकु करायची.मी काकुसोबत नदीवर जायचो काकु पाण्याचा गुंड भरेपर्यंत जवळच पोहणे येत नसले तरी नदीत डूंबायचो,एके दिवशी मी गटांगळ्या खात खोल पाण्यात वाहात डोहात गेलो.सुर्याला अर्ध्य देत असलेल्या न्हाव्याच्या हातात सापडलो.त्याने मला बाहेर आणले,घरी आणले ! सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.मला पोहता येत नव्हते त्यामुळे मी पुन्हा नदीवर कधीच गेलो नाही.

त्यावेळचे सकस अन्न व व्यायाम आणि पाटील मंडळीसहचा आखाडा, ह्यामुळे बाबांची शरीर बलदंड झाले होते.वेळ पडली तर ८-१० जणांना ते हातातील बांबुने भिंतीत सहज दाबुन धरत.त्यांचा तसा गावात धाक होता.आमच्या कुटुंबातील दिवंगत महादेवकांचेच नावावरुन माझे नाव महादेव पडले होते.

त्याकाळी सोनार समाजात श्री.हिंगणेकरमामा,श्री.उज्जैनकर आजोबा व डॉक्टर ठोसरआजोबा ही त्रिमुर्ति प्रतिष्ठित,वजनदार मानत असत.एकदा ही त्रिमुर्ति सोमवती अमावस्येला शिवमंदीराजळील पूर्व-वाहीनी पुर्णानदीत स्नानास आले.आमच्या घरीह आले.भुकेची वेळ झाली होती.समोरच्या दुर्गादास मारवाड्याच्या दुकानातुन उधारीवर सामान आणुन ति. आईने शिरा-पुरीचा स्वयंपाक केला.सायंकाळी बाबा आले.सर्व ,काका,आजोबांशी गप्पा झाल्या. त्यांनी सर्व परीस्थितीचा विचार केला.गावात लहान शाळा आहे, महादेवच्या शिक्षणाची सोय काय? श्री हिंगणेकरमामा म्हणाले”ह्याचि जबाबदारी माझी.अकोल्याला सर्व सोयी शाळा,कालेज…ई.आहेत.आमच्या घरी महादेवला घेऊन जातो.तुम्ही त्याला मधुन मधुन भेटायला या.विचारविनिमय करुन ति.आई,बाबांची परवानगी/सम्मती मिळाली.दुसर्‍याच दिवशी मी त्यांच्यासोबत अकोल्याला आलो.ति.आई,बाबा मधुनमधुन मला भेटायला अकोल्याला येत असत.