मुक्काम रिधोरा (बाळापूर )-अकोला .

अकोला येथून ९ .मैलावर बाळापूर रोडवर रिधोरा हे गांव आहे . गावाची प्रसिध्दी म्हणजे त्यावेळचे मंत्री महोदय माननीय श्री .गोविंदराव सरनाईकांची सासुरवाडी रिधोरा . गांव तसा मोठा जागृत कार्यकर्त्यांचा , त्यातही तरूण कार्यकर्ते जास्त .गावचे श्री . रंगराव पाटील यांचा तसा दरारा होताच .त्यांचा ट्रँक्टर दुरूस्तिचा कारखाना अकोल्याला सावतराम मिल रस्यावर होता . त्यांचे गावातील सर्व घडामोडींकडे बारीक लक्ष असायचे .रिधोरा ऊच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री .खाकरे गुरूजीअनेक वर्षापासून रिधोरा येथेच होते .त्यांचा रिधोरा गावच्या जडणघडणीत मोठा सहभाग होता . श्री . खाकरेगुरूजी स्काऊटचे अकोला जिल्हयाचे  उपप्रमुखही होते .स्काऊटचे जिल्हा प्रमुख श्री .कुळकर्णी , हे अकोला जिल्हापरिषदेत उपशिक्षणाधिकारीही होते .  माझे मावसभाऊ  पातूरचे श्री . प्रभाकर तुळशीराम ठोसर हे शिक्षक म्हणून रिधोरा शाळेवर बरेच वर्षापासून होते . त्यांनी सेवानिवृत्तीचे कारणावरून पातूर जवळ बदली मागीतली होती . परंतू गांव आणि रंगरावबापू त्यांना सोडायला तयार नव्हते .आई -वडील वृध्द आहेत , त्यांच्या सेवेसाठी गांवी नाहीतर गावाजवळ जाणे अत्यावश्यक आहे हे त्यांना पटवून सांगीतल्यावर ते श्री . ठोसर गुरूजींच्या बदलीसाठी ते सर्व राजी झाले ,पण त्यांचे जागेवर तसेच दुसरे गुरूजीं त्यांना मिळाले पाहिजेत ही अट होती . योगायोगाने मला अकोला जवळील गांवाला बदली मिळाली ,त्यांचेही समाधान झाले .

रिधोरा शाळा केंद्रिय ऊच्च प्राथमिक शाळा केल्याचा आदेश शिक्षण संचालकांच्या सहमतीने अकोला जिल्हा परिषदेने निर्गमित केला . आता रिधोरा शाळेवर पदवीधर प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापकाची नियुक्ती होणार असल्याने आताचे मुख्याध्यापक श्री . खाकरेगुरूजींची बदली निश्चित होणार , ही बातमी रिधोरा ग्रामवासीयांना समजली , श्री .रंगराव पाटीलांनाही कळली . आता काय करावे ? सगळ्यांनी अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी ह्यांची भेट घेतली . स्थानिक राजकीय पुढारीसुध्दा विचारात पडले . केंद्र शाळा बदलण्याचा निर्णय शिक्षण संचालक ,पुणे हयांचेकडे असल्याने अकोला जिल्हा परिषदेला निर्णय घेणे शक्य नव्हते . रिधोरा गावाने अनोखा सत्याग्रहाचा निर्णय घेतला . श्री. रंगराव पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावात समांतर शाळा सुरू केली . शाळेत एकही मुलगा पाठविणार नाही . शाळेत स्वत: श्री .रंगराव पाटलांनी येऊन सर्व शिक्षकांना ह्याची कल्पना दिली . सर्व स्थानिक राजकीय पुढारी एकत्र आले . महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांना अकोला- बाळापूर – अकोला हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला . माननीय श्री .गोविंदराव सरनाईकांना ही बातमी कळली . त्यांनी स्थानिक पुढार्यांना बोलावून घेतले , चर्चा केली . शासनाच्या शिक्षण विभागाशीही चर्चा केली अकोला जिल्हा परिषदेतील , बाळापूर पंचायत समितिमध्ये केंद्रिय शाळा , रिधोरा ऐवजी वाडेगांव जवळच्या नकाशी येथील मोठ्या शाळेची निवड करण्याचे सुचविले . त्याप्रमाणे पुणे शिक्षण संचालकांकडे तसे निवेदन , ठराव अकोला जिल्हा परिषदेमार्फत पाठविणेत आले . त्याप्रमाणे रिधोरा केंद्र शाळेऐवजी नकाशी येथे केंद्र शाळा स्थानांतरीत करणेत आली .
मला अकोला-बाळापूर रोडवर अकोला येथेच पोळा चौकात भाड्याने खोली मिळाली होती . ति.रा. रा.बाबांची तब्येत दाखविणेसाठी अकोल्याला आणले होते. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घेण्यास सांगीतले .मेडशीला घरी लहान भाऊ मुरलीधर व प्रमोद तसलेच ज्योती व सुषमा ह्या दोन बहिणी होत्या .मुरलीधरला अकोल्याला ति.सौ. आईसोबत आणावे लागले . मेडशीला सौ . निर्मलासोबत ज्योतीताई , प्रमोद व माई (सुषमा )ला ठेवावे असा निर्णय घेतला . वैद्यकिय ऊपचार सुरू झाले .
एके दिवशी मी जिल्हा परिषद शिक्षण विभागात गेलो ,तेथे श्री .पल्हाडे शिक्षण लिपिकांच्या टपालात केंद्रिय शाळेवर पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या बढतीचा आदेश होता . त्यांत पहिल्याच क्रमांकावर माझे नांव होते . नियुक्तितचे ठिकाण भर- जहागीर पंचायत समिति रिसोड दाखविले होते.माझा ह्यावर विश्वासच बसेना अकोला जिल्ह्याच्या मराठवाडा सिमेजवळ माझी नियुक्ति करणेत आली होती . रिधोरा येथे नियुक्ति झालेल्या केंद्रिय शाळा मुख्याध्यापकांची व माझी २-३ दिवसापूर्वीच भेट झाली होती ,पण त्यांच्या बोलण्यातून माझ्या नियुक्तिबाबत काहिही कळले नव्हते . मी लगेच ति.रा.रा. मोठेमामांकडे गेलो .ते मुख्य कार्यकारीअधिकारी अधिकारी ,जि . प. अकोला यांचेकडे स्वीय सहाय्यक होते , त्यांनी उपरोक्त आदेशाची प्रत फोन करून मागविली व खात्री करून घेतली . वडील आजारी आहेत , वैद्यकीय उपचार सुरू आहेत .भर-जहागीर हे अकोला पासून वाशीम- रिसोड मार्गावर एस. टी. ने ६ तास अंतरावर असल्याने निकडीच्या वेळी अकोल्याला येणे अशक्य कोटीची बाब आहे . हे कारण नमूद करून माझी नेमणूक भर -जहागीर ऐवजी अकोला जवळच्या केंद्रिय शाळेवर करणेत यावी असा विनंती अर्ज आवश्यक ती कागदपत्रे जोडून, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , अकोला यांचेकडे तांतडीने करणेत आला .
रिधोरा येथे शाळेत आणि गावात ही बातमी कळली , त्याचवेळी रिधोरा केंद्रशाळा नकोचे वारे जोरात होते . श्री.रंगरावपाटील स्वत: शाळेत आले. ”आमच्या रिधोराहून श्री .लोणकर गुरूजींची बदली होऊ देणार नाही ”.मुख्याध्यापक श्री.खाकरे आणि इतरांनीही त्यांना सांगीतले की श्री.लोणकर गुरूजींना प्रमोशन मिळाल्याने ते केंद्रियशाळा मुख्याध्यापक पदावर भर-जहागीरला जाणारआहेत . हे ऐकताच श्री. रंगराव पाटील म्हणाले ‘भर-जहागीरला गोसाव्यांचीच चलती आहे .पण मी त्यांच्यासाठीच पत्र देतो . ते आपलाच माणूस म्हणून सांभाळतील ,बिलकूल काळजी करायची नाही . दरम्यान
मुख्य कार्यकारी अधिकारी , जि. प. अकोला हयांच्या सुधारित आदेशाप्रमाणे माझी फेर- नियुक्ति केंद्रिय शाळा मुख्याध्यापक , हातगांव , पंचायत समिति ,मुर्तिजापूर येथे करण्यात आली .
मी ह्या सुधारित आदेशाप्रमाणे पंचायत समिति ,मुर्तिजापूर कार्यलयांत माननीय संवर्ग विकास अधिकारी , सहाय्यक ऊपशिक्षणाधिकारी श्री. खानझोडेसाहेबांना भेटलो .त्यांच्या लेखी निर्देशाप्रमाणे ४ किलोमीटर अंतरावरील हातगांव शाळेवर मुख्याध्यापकांना भेटलो .ह्यावेळेपावेतो दुपारचे ५.३० वाजून गेले होते .तेथील मुख्याध्यापक आरखेडकरांना ऊद्या शुक्रवारी कार्यमुक्त करतो मी आजपासूनच कार्यभार घेईन असे सांगून अकोल्याला परत आलो . हातगांवला शुक्रवारी मुर्तिजापूर बाजारचा दिवस असल्याने सकाळची शाळा होती . त्याप्रमाणे मी सकाळीच ७ वाजता शाळ्वर हजर झालो . जुन्या आदेशाप्रमाणे दुसरे गुरूजीही केंद्रिय शाळा मुख्याध्यपकाचा कार्यभार घेण्यासाठी कालच हजर झाले होते . ते गुरूजीसुध्दा हजर झाले .श्री . आरखेडकर गूरूजीही आले . तेव्हड्यात मुर्तिजापूरहून श्री . खानझोडेसाह्बemही शाळेला भेट देण्यासाठी आले . त्या दिवशी शाळेवर ३ मुख्याध्यापक हजर होते .
श्री .खानझोडे साहेबांनी आम्हा तिघांनाही प्रश्न विचारला . आज आता नवीन केंद्रिय शाळा मुख्याध्यापकाचा कार्यभार तुमच्या तिघांपैकी कोण घेणार आहे ? श्री . आरखेडकर गुरूजी तर पदवीधारक नाहीत , ऊरले तुम्ही दोघे ! मी बोललो ‘ सर आपण वरिष्ठ अधिकारी आहात ,आपला निर्णय आम्ही मान्य करू .’ श्री. खानझोडे साहेबांनी विचारले ,कोणाचा आदेश Latest आहे , दाखवा बघु मला , आता .हा श्री .लोणकर गुरूजींचा सुधारित आदेश Latest आहे .त्यामुळे केन्दिय शाळा हातगांवच्या मुख्याध्यापकाचा कार्यभार तेच स्विकारतील आणि ईतर दोघांनाही त्वरीत कार्यमुक्त करतील .
त्याप्रमाणे मी हातगांव शाळेच्या सर्व १८ शिक्षकांना बाजूच्या खोलीत एकत्र बोलाविले , दोघांचे कार्यमुक्त अहवाल तयार करण्याचे काम श्री .ठाकरे गुरूजींना सांगितले . ईतरांना शाळेच्या स्टॉकबुकाची अनुक्रमणिका प्रमाणे , उदा . लाकडी फर्निचर , सायंसची उपकरणे , वाचनालयील पुस्तके…….ई. ची हजर स्टॉकच्या प्रत्येकी चार प्रतित तयार करण्यास सांगितले . सातव्या वर्गातील ३ मुलांना जवळच्या स्टँडवरील हॉटेल मधून २५ चहा-पोहे आणायला सांगितले . हातगांव शाळेचा कार्यभार गेल्या २० – २२ वर्षापासून कोणीही पाहिला , दिला – घेतला नव्हता .साधारणपणे ४० मिनिटात दस्त ऐवज जसा आहे तसा सर्व कार्यभाराच्या प्रत्येेकी ४ – ४ प्रति तयार झाल्या . मी त्यावर स्वाक्षरी केली , जावक बारनिशीचा क्रमांक टाकून कार्यभार घेतल्याच्या अहवाल -प्रति
१ ) श्री .आरखेडकर गुरूजींना २ ) पं .सं .मुर्तिजापूरला ३ )शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अकोला व ४ )स्थळ प्रत तयार झाल्या . सर्वांचा चहा-नास्ता झाला.
श्री . खानझोडे साहेबांना कार्यभार घेतल्याचा अहवाल सुपूर्द केला . त्यांना खूपच आश्चर्य वाटले , आनंद वाटला . कारण कार्यभार घेणे फारच किचकट व वेळखाऊ काम असते .ते काम ईतक्या झटपट झाले होते . मी ह्याचे श्रेय माझ्या शिक्षकवर्गाला दिले . मी फक्त एवहढेच म्हणालो , सर मला मिळालेल्या वस्तुंची जबाबदारी माझी . न मिळालेल्या वस्तुबाबत नंतर यथावकाश ठरविता येईल .