मुक्काम कुरणखेड/काटेपूर्णा

अन्वी -मिर्झापूरहून स्थानांतरणाने , माझी बदली कुरणखेड/काटेपूर्णा ,पंचायत समिती ,अकोला येथे करण्यात आली . अकोला -मुर्तिजापूर रोडवर २० मैलावर कुरणखेड हे गांव आहे . गांवाजवळ काटेपूर्णा नदीच्या काठावर अतिपुरातन असे देवीचे देऊळ आहे .येथे जुन्या कुरणखेड जवळ मूर्तिजापूर रोडवर कोळंबी गांवाच्या अलिकडे नवीन कुरणखेड वसविलेले आहे . येथील शाळा नदीकाठावरच टेकडीवर आहे .येथील जि.प.मराठी माध्यमिक शाळा ,दुबार पध्दतिने भरायची ,वर्ग १ ते ४ सकाळी तर वर्ग ५ ते ७ दुपारी भरविले जात. येथील मुख्याध्यापक , अकोल्याजवळच्या उगवा या गावाचे , श्री .देशमुख आप्पा होते . श्री.लोनसने गुरूजी शेगांव जवळच्या पातूर्डयाचे ,अकोल्याचे डॉ.कुळकर्णी गुरूजी , नवीन कुरणखेडमध्ये राहणारे श्री.नानोटी गुरूजी ,श्री. ओवे गरूजी तर जुन्या कुरणखेडमधील श्री. जामोदेगुरूजी ,श्री.छत्रपालसिंह राजपूत , श्रीमती जोशीबाई ,श्रीमती कस्तुरेबाई , श्री. जेाशी गुरूजी ,श्रीमती अलका देशमुखबाई श्रीमती नानेोटीबाई….इ. शिक्षकवृंद होता . मी कामावर रूजू झालो .येथे सुध्दा मी वयाने सर्वात लहान होतो . मला नवीन कुरणखेड गावात श्री. शंकर कुंभाराची खोली भाड्याने मिळाली .समोरच्या खोलीत अकोल्याजवळच्या डोंगरगांवचे डॉक्टर श्री .देशमुख होते .माझे ह्यासगळ्यांबरोबर छानच जमले होते .डॉक्टर देशमुखांचे काका श्री.भाऊसाहेब देशमुख स्वातंत्र्य-सैनिक होते . त्यांचे मोठे भाऊ डोंगरगांवचे सरपंच होते, मधले भाऊ मुंबईला विक्रीकर खात्यात , विक्रीकर निरीक्षक , पदावर कार्यरत होते ,सगळ्यात लहान भाऊ बाळासाहेब कृषिखात्यात ,पंजाबराव कृषी विद्यापीठात नोकरीला होते .मी डोंगरगांवला त्यांच्या घरी मधून मधून जात असे . श्रीमती नानोटी बाईंच्या भावाची अकोल्याला , श्री. विजय ईंडस्ट्री नावाचा कारखाना होता . श्री.नानोटी गुरूजींचे मोठे भाऊ , पंचक्रोशीत प्रसिध्द व नावाजलेले श्री. नानासाहेब , प्रसिध्द वैद्य होते . पुतण्याही मुर्तिजापूरला डॉक्टर होता .श्री.नानोटी गुरूजींच्या वाड्यात डॉ. कुळकर्णी गुरूजीही राहत.त्यांच्या घराजवळच मलेरीया खात्यातील श्री.देशमुख तसेच बांधकाम खात्यात काम करणारे श्री. काळे साहेब राहात होते. माझे नवीनच झालेले मित्र श्री.शंकरराव बोळे आमच्या घरा जवळच राहात .ह्या सर्वांशी माझी चांगली गट्टी जमली होती.

शाळेत तर सर्व शिक्षकवृंद , विद्यार्थांचा मी आवडता गुरूजी झालेलो होतो. सकाळीच शाळेत गेलो की मला मुख्याध्यापक श्री. देशमुख. गुरूजींच्या आदेशाप्रमाणे प्रार्थनेला पी. टी.आय. म्हणून हजर असायचो . नंतर शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी , वर्ग ४ तसेच वर्ग ७ च्या विद्यार्थ्यांचे विषेश वर्ग घेई . त्यानंतर शाळेचे विविध अहवालाचे काम करण्याची जबाबदारीही माझेवरच दिली गेली . शाळेच्या वरच्या वाड्यात श्री.देशमुख आप्पा , श्री. जोशी गरूजी , श्री. जामेादे गुरूजी तसेच श्रीमती जोशीबाई राहात . माझी जेवणाची , दुपारच्या चहाची सोयग वरच्या वाड्यातच असे , बोलवायचे मुख्याध्यापक पण बहुतांशी श्रीमती जोशी बाईंनाच चहा करायला सांगीतले जायचे .श्रीमती जोशीबाईंना स्वयंपाकही फारसा येत नव्हता मुख्याध्यापक श्री. देशमुख आणी इतर शिक्षक श्रीमती जोशीबाईंची मधूनमधून फिरकी घेत असत. एका प्रकारे जोशी बाईंचे कम्पलसरी ट्रेनिंग सुरू होते . मी गहू दळण्यासाठी आणलेली पिशवी सकाळीच ,माझ्या सायकल वरून अदृुश्य व्हायची . दुपारी घरी जातांना त्या पिशवीत गव्हाचे पीठअसायचे .

गावाच्या सरपंच श्रीमती देशमुखबाई होत्या . त्यांचे मोठे दिर श्री. जे . वाय,. देशमुखसाहेब जिल्हा परिषद, अकोलाचे , मुख्य कार्यकारी अधिकारी , म्हणून कार्यरत होते . मुंबई – कलकत्ता व्हाया नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरच कुरणखेड हे गांव होते . बव्हंशी शासकीय / निमशासकीय कार्यालयाचे अघिकारी, कर्मचारी कुरणखेडलाच मुख्यालयी राहत होते . डॉ. देशमुख होमिओपँथीची औषधे देत असत .त्यांच्या अकोल्याच्या होमिओपँथी कॉलेजचे , प्राचार्य ,डॉक्टर श्रॉफ होते . त्यांना मी माझ्या लहानपणापासून चांगले ओळखत होतो . अत्यंत हुषार आणि निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची प्रसिध्दी होती . ते ति . मोठे मामांच्या घरी कौटुम्बीक संबंध असल्याने नेहमीच येत असत . मी आणि लहान मामांची मीठ खाण्याची जणू शर्यतच लागायची . डॉक्टर श्रॉंफांची औषध घेतल्या नंतर आमची अति मीठ खाण्याची सवय बंद झाली होती .
एकदा कधी नव्हे त्यावेळी नवीन कुरणखेडमधील कादर नांवाच्या मुलाला कुळकर्णीसरांच्या सायकलवर घेऊन शाळेत आणत होतो . अचानक त्या मुलाचा एक पाय सायकलमधे पुढच्या चाकात गेला , सायकलच्या पुढच्या चाकाचे ७-८ स्पोक तुटले,कादरचा पाय रक्ताळला गेला. मी त्याला घेऊन शाळेजवळच्या डॉक्टर देशमुखांकडे घेऊन गेलो . त्यांनी कादर खानच्या पायाला मलमपट्टी करून दिली .औषधीही दिली . मी कादरला घेऊन ,त्याच्या घरी पोहेाचविले . सायकल श्री. कुळकर्णी सरांसोबत अकोल्याला नेऊन दुरूस्त करून दिली

नवीन कुरणखेड गावात माझे मित्रमंडळात श्री. वामनराव बोळे , नाटकवाले सप्रे कुटुंबीय कधी सामील झाले ,कळलेच नाही. श्री. नानोटी गुरूजींचा मित्रपरिवार खुप मोठा होता. ते स्वत: ” पाणी रे पाणी तेरा रंग कैसाss , जिसमे मिलाए वैसा ,” ह्या म्हणीप्रमाणे सब गुणी मौला सारखे होते .सर्व बरे-वाईट गुणसंपन्न तसेच आधुनीक विचाराचे होते. कमलपत्राप्रमाणे चिखलातील पाण्यात राहूनही पाण्याचा थेंबही धरून ठेवायचे नाहीत . त्यांचे आयुष्यातील गमतीजमती ते लहर आली तर खूप रंगवून सांगत .त्यांच्या मते नवीन पिढीने बरे वाईट अनुभव स्वत: घेऊन आधुनिक विचाराने असे का ? कसे ? कधी ? स्वत: निर्णय घेणे आवश्यक आहे . सप्रे कुटुंबीयातील सगळे सदस्य ,अगदी ६ व्या वर्गात शिकणार्या मुलीसह नाटकात काम करीत . त्यासाठी ते सर्वजण गावोगावी फिरत . मलेरीया सुपरवायझर श्री. देशमुखांचा सप्रे कुटुंबीयांशी घरोब्याचे संबंध होते.

कुरणखेडला आमचा ग्रुप चांगलाच जमला होता .शाळेतील श्री. छत्रपालसिंह राजपूत सरांनी आम्हा सर्व शिक्षकांना वर्धा राष्ट्रभाषा प्रवीण , हिंदी परिक्षेला बसविले होते. आमच्या कुरणखेड केंद्रातील ८०% शिक्षक ऊत्तीर्ण झाले होते.मी कुरणखेड केंद्रात प्रथम आलो होतो . त्यानिमित्ताने गेट-टुगेदर पार्टीत इतर सर्व शिक्षक-शिक्षिकाही सामील झाल्या होत्या . एकंदरीत सर्वत्र अत्यंत खेळीमेळीचे व सलोख्याचे वातावरण तयार झाले होते . मला ह्यातून नवनवीन गोष्टी , अनुभवातून शिकायला मिळाले .

सर्व शिक्षकांनी मिळून दर महिन्यात प्रत्येकी १० रूपये प्रमाणे भि .सी . सुरू केली होती . परतफेड १० रूपये अतिरीक्त प्रमाणे करून तात्पुरते कर्ज घेण्याची सोयही करण्यात आली होती.

नवीन कुरणखेड जुन्या गावापासून दोन मैलावर होते. गांवातील घरे लांब लांब अंतरावर होती .त्यामुळे मधून मधून चोरीचे प्रकार होत . दिवाळी जवळच आली असल्याने घरोघरी गोड-धोड पदार्थ जसे लाडू , करंजी , अनारसे तसेच चकली ,शेव …..इ. तयार करण्यात येत होते . श्री . नानोटी गुरूजींचे घर म्हणजे एक मोठा दुमजली वाडाच होता. वरच्या मजल्यावर खोल्या काढलेल्या होत्या .खालच्या भागात स्वयंपाक-घर ,कोठी-घर ,वैद्य नानासाहेबांचा चार खोल्यांचा प्रशस्त दवाखाना होता , अत्यवस्थ रोग्यांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तीन खोल्या राखून ठेवण्यात आल्या होत्या .स्वयंपाक-घराच्या लागूनच नानोटींच्या वृध्द मातोश्रींची झोपण्याची खोली होती . झोपण्याच्या पलंगाजवळ हवेसाठी मोठी खिडकी होती .

दिवाळी पंधरा दिवसांवर आलेली असल्याने सगळ्या गृहिणींची वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची लगबग जोरात होती .रात्री उशीरापर्यंत जागरणं होत असत . अंथरूणावर पाठ टेकल्या-टेकल्या कोणाला कधी झोप लागली हे समजले नाही .सर्वांना गाढ झोपा लागल्या . लहान आवाजाने झोपमोड होणार नव्हती . ह्याऊलट वृध्द मातोश्रींची झोप मात्र जागृत होती . एकदा मध्यरात्रीनंतर ४ – ५ चोर खिडकिचे गज वाकवून मातोश्रींच्या खोलीत शिरले . चोरांना वाटलं म्हातारी गाढ झोपलेली असेल .म्हातारीला ओलांडून चोर आत शिरले . म्हातारीने प्रसंगओळखला . अंधार असल्याने एका चोराचा पाय म्हातारीला लागल्याचे त्याच्या लक्षात आले नाही.एका चोराने स्वयंपाक घर शोधलं , इतरांना स्पर्शाने मागोमाग बोलावले , सगळ्यांना बनविलेल्या पदार्थांच्या ताज्या वासाने आपल्याला प्रचंड भुक लागल्याची जाणीव झाली . तेवढ्यात म्हातारीचा झोपेतच बरळल्यासारखा आवाज आला , ”पोट भरून खा s s रे s s बाबांनो , आवाज जास्त करू नका , घरातले इतर लोक जागे होतील नाही ss तर . चोरांना वाटलं ,आपल्यापैकीच कोणीतरी बोललं असेल ! सगळ्या चोरांनी पोटाला तडस लागे पर्यंत खाल्लं ! ! आधीच तेलकट , तुपकट , त्यातच गोsड गोsड चव मग सर्वजणांवर निद्रादेवी अति s च प्रसन्न झाली . सगळ्यांना अगदि -गा s s ढ झोपा लागल्या . पहाट झाली , सर्व गृहिणी लगबगीने उठल्या , स्नानादी आटोपून त्यापैकी दोघीजणी स्वयंपाक घराजवळ आल्या , बघतात तो काय ? दरवाजा सता s ड उघडा , नी सगळे चोर गा s ढ झोपलेले .

पुरूष मंडळींना उठविण्यात आले . स्वयंपाक – घराच्या दाराची कडी बाहेरून लावून पोलीसांना पाचारण करण्यात आले . पंचनामा करायचा , तर चोरीला काय काय गेले ? कोणालाही सांगता आले नाही . शेवटी पोलीस चोरांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले . तेथे जुन्या गावात श्रीमती अलका देशमुखबाईंच्या घरी तिसर्या मजल्यावर चोरी झाल्याची तक्रार घेऊन आल्या होत्या . चोरांनी साखर , चहा ,
तुर-डाळ पळविली होती .

मी आणि डॉक्टर देशमुख शंकर कुंभाराच्या खोलीत समोरासमोर राहात होतो .आमच्या दोन्ही खोल्यात बरेच वेळा रात्री सर्वत्र काळ्या मुंग्या निघत . ह्या मुंग्या कोठून येत कधीही समजले नाही . खोलीच्या सगळ्या भिंती ,छत , खाली फरशीवर , जणूं काही आच्छादनच ( cover ) केले आहे ,असे कोणालाही वाटे .सकाळी मात्र अचानकपणे जशा येत तशाच अंतर्धान पावत . परिणामी आम्हा दोघांनाही खोलीच्या बाहेर व्हरांड्यात पथारी पसरून निद्रादेवीची आळवणी करावी लागे .

मला नवीन कुरणखेडमधील दुधवालीच्या पाचवीतील मुलीची शिकवणी घ्यावी लागली होती . सकाळी मी चहा , नाश्ता , जेवण …..इ. ची तयारी करतां करता त्या मुलीची शिकवणी घेत असे . गुढी-पाडव्याचा दिवस होता , मी सर्वांना surprise करायचे असा विचार केला . मी एकटाच राहात होतो .वर्षारंभिचा पहिलाच सण म्हणून पुरणपोळी करायच ठरविले . माझ्याकडे वातीचा स्टोव्ह होता. दुकानदाराकडून आणलेले रॉकेल तेल स्टोव्हमध्ये पूर्ण भरलेले होते . हरबर्याची डाळ लहान पातेल्यात टाकली ,पाणी घालून डाळ शिजायला टाकली . मला वाटले दहा पंधरा मिनिटांत डाळ शिजेल ,पाहतो तर स्टोव्ह विझला होता . वाती जळून गेल्या होत्या ,पातेल्यातील पाणी संपले होते . स्टोव्हच्या वाती वर सरकऊन पुन्हा पातेल्यात थंड पाणी घालून डाळ शिजायला ठेवली. थोड्याच वेळात स्टोव्ह वुिझला . रॉकेल तर पुर्ण भरलेले होते . मग स्टोव्ह का विझला ? कारण समजेना .
तेवढ्यात दुधवालीबाई मुलगी घरी यायला उशीर कां झाला ? पाहायला आली . स्टोव्हवर पातेले , मी विचारात ? त्या बाईंनी डाळ शिजली .काय ? पहायला पातेल्याचे झाकण काढले . तिच्या लक्षात सर्व प्रकार आला . डाळ शिजली नाही , तर बठ्रठरली आहे ., कधीही शिजणार नाही . तिने विचारले गुरूजी पुरण-पोळीचा बेत आहे वाटते ! ! पण डाळ वाटणार कशावर ? मी ही डाळ घेऊन जाते . पुरण पोळ्या पाठवून देते . माझ्या तसेच डॉक्टर देशमुखांच्याही लक्षात
आले की, रॉकेलमध्ये पाणीच जास्त आहे . आम्ही दोघेही दुकानदाराकडे गेलो . त्याने झालेली चूक कबूल केली , पुन्हा भेसळ नसलेले रॉकेल दोन लिटर दिले व पुढे प्रकरण नेऊ नका अशी विनंती केली .

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी गावातून काढण्यात आली . प्रत्येक शिक्षक आपापल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसोबत होते , मी शाळेचा पि . टि . आय . असल्याने माझ्या हातात निर्गुडीचा फोक छडीसारखा होता . संपूर्ण प्रभात फेरी अगदी शिस्तीत , घोषणा देत , हातात घोषणांचे फलक घेऊन , बँडच्या तालावर कुरणखेड गावाच्या मुख्य रस्त्यावरून जात होती . ग्रामपंचायतच्या मैदानात आपल्या देशाचा मानबींदू असलेल्या तिरंगी झेंडा फडकविण्यात आला . झेंडावंदन , राष्ट्रगीत , सरपंच श्रीमती देशमुखबाईंचे , तसेच मुख्याध्यापक श्री . आप्पा देशमुख , गावातील प्रतिष्ठितांची थोडक्यात भाषणे झाली. मुलांना खाऊ म्हणून छान आंबटगोड गोळ्या वाटण्यात आल्या .

वर्ष संपत आले , शाळेच्या परिक्षा झाल्या , निकालही जाहीर झाले . उन्हाळ्याच्या सुट्या लागणार होत्या . मी अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक तोही जादा शिक्षक असल्याने १ मे पासून सेवेतून कमी करण्यात आले .अकोला जिल्हा परिषदेतील सर्वच अप्रशिक्षीत प्राथमिक शिक्षकांना कमी करण्यात आले होते .

अन्वीमिर्झापूर

उन्हाळयाच्या सुटीनंतर ‘अप्रशिक्षित जादा शिक्षकांना ‘१ जुलै १९६४ पासून पुन: नियुक्तीचे आदेश अकोला, जि.प.शिक्षणाधिकारी यांनी दिले.त्याप्रमाणे मला पंचायत समिती ,अकोला मधील अन्वी-मिर्झापूर येथे प्राथमिक शाळेत नियुक्ति
मिळाली.अन्वीमिर्झापूर हे गांव अकोला मुर्तिजापूर ह्या मध्य-रेल्वेच्या मार्गावरील बोरगांव रेल्वे स्टेशनपासून चार फर्लांगावर आहे.तेथील जि.प. प्राथमिक शाळेवर माझी जादा शिक्षक म्हणून नेमणूक झाली . तेथे कारंजाचे , श्री. देशमुखगुरूजी मुख्याध्यापक होते . ह्या व्यतिरीक्त पळसो-बढेचे श्री.बढे गुरूजी,श्री.तायडेगुरूजी व शेगांवचे ,श्री. बायसगुरूजीही होते. मी कामावर रूजू झालेा, पाचवा जादा शिक्षक महणून .मी आणि श्री. बायस गुरूजी बन्सीधरांच्या खोलीत राहायला लागलो . सायंकाळी आम्हीआठजण जेवावयाला एकत्र बसत होतो . श्री.हरिभाऊ आणि श्री.शंकरराव हे दोन मळेवाले,श्री.देशमुखगुरूजींचे भाऊ सगळे मिळून एका कुटूंबातीलच होतो , जणू . कामावर रुजू झालो त्यादिवशी मी मामाच्या घरून डबा आणला होता . दुपारच्या सुटीत श्री.तायडेगुरूजींनी घरी जातांना मला त्यांच्या घरी जेवायला चलण्याचा आग्रह केला .त्यांचे घर शाळेच्या जवळच होते.मला जातीभेद मान्य नव्हता. श्री.तायडे गुरूजी बौध्द होते . त्याच दिवशी दुपारच्या सुटीत मी त्यांच्या घरी जेवायला गेलो. त्यांच्या घरी म्हातारी आई , पत्नी , मुलगा मिळून ४ जणांचे चौकोनी कुटूंब होते . त्या दिवशी म्हातारीने तुरीच्या दाण्याचे मसाल्याचे वरण केले होते .ते मला फार आवडले

तेथील श्री.कादरपाटील , हे गांवचे पोलीस पाटील होते .त्यांचा लहान मुलगा तिसरीत शिकत होता .त्याला तिसरीत असुनही काहिच येत नव्हते. त्याची शिकवणी कोणीही घ्यायला तयार नव्हते ,मला सर्वांच्या आग्रहाखातर त्याची शिकवणी घ्यावी लागली .येथेही वयाने सगळ्यात लहान /अननुभवी पण शिक्षण सर्वात जास्त .श्री.कादर पाटलाचा एक मुलगा कॉलेजमध्ये अकोल्याला शिकत होता ,तर दुसरा मलगा बोरगांव-मंजू येथे दहावीत शिकत होता. त्या दोघांचीही शिकवणी घ्यावी , असा पोलीस पाटलांचा आग्रह होता. परंतू मला वेळे अभावी वरच्या वर्गातील मुलांची शिकवणी घेणे शक्य होणार नाही असे मी कादर पाटलांना प्रत्यक्ष भेटून सांगीतले . त्यांच्या लहान मुलाच्या शिकवणुकीबाबत मी त्यांना दोन अटीं सांगितल्या (१ ) मी त्यांच्या घरी शिकवणीसाठी येणार नाही , मुलाला मी माझ्या घरी शिकवीन.(२ ) मी दरमहा २० रूपये प्रमाणे चार महिन्याचे ८० रूपये अगोदर घेईन , त्याची प्रगती पाहून पुढे योग्य तो निर्णय घेऊ. श्री.कादर पाटलांनी सर्व अटी मान्य केल्या . शिकवणी सुरू झाली मुलगा सकाळी ८ वाजता शिकवणुकीला येवू लागला , मी घरचे काम करता करता शिकवायचो . दोन महिन्यात मुलाची चांगली प्रगती झाली . श्री.कादर पाटलांना बरे वाटले . त्यांचे घरी दुधदुभते होते ,त्यांचे घरून दही ,ताक , दूध ,..इ. मधून मधून पाठविले जायचे . श्री .बायस्कर गुरूजींना स्वयंपाक चांगला येत होता , मधून मधून कढी छानच बनवायचे ,भाज्यासुध्दा छानच करायचे .

त्यावेळी जिल्हा परिषदेच्या खाती पगाराची ग्रँट शासनाकडून न आल्याने तीन महिन्याचा पगार कोणालाच मिळाला नव्हता. मला B.Sc. Part One च्या परिक्षेचा Supplementary चा अर्ज भरायचा होता . परंतू परिक्षा फी ५० रू. भरायची सोय कशी करावी ? मला मार्ग सुचेना ! मुख्याध्यापक श्री. देशमुखगुुरूजीं आणि श्री.बायस्करगुरूजींना एक मार्ग सुचला . बोरगांव-मंजू रेल्वे-स्टेशनवर अकोल्याच्या श्री.हाशमशेटचा बंगला आहे .त्यांचेकडून ५० रूपये हातऊसने घेवून पगार झाल्यावर परत देता येतील.मला हा विचार पटला .त्याप्रमाणे त्याचदिवशी शाळा सुटल्यावर श्री. हाशमशेटच्या बंगल्यावर जायचे ठरविले .श्री.देशमुखगुरूजी आणि श्री.बायस्करगुरूजींना घेवून मी सायंकाळी जेवणं झाल्यावर श्री.हाशमशेटच्या बंगल्यावर पोहोचलो .त्यांना सर्व समजावून सांगीतले .त्यांना आपला एका शिक्षक उच्च शिक्षणासाठी धडपडतो आहे ,ही बाब फार आवडली.त्यांनी लगेच ५० रूपये काढून दिले.परत घरी येतांना श्री.बायस्कर अंधारातून येतांना विंचू चावला . ह्यापुढे मला पुढे कोणतीही अडचणआल्यास न संकोचता येण्यास श्री. हाशमशेठ यांनी सांगीतले.मी लगेच अकोल्याला जावून परिक्षेचा फॉर्म भरला.

श्री.हरीभाऊंच्या आणि श्री. शंकररावांच्या मळ्यात केळी ,पानकोबी , फुलगोबी , ऊस ,…इ . ची लागवड केलेली होती .आम्ही सर्वजण सुटीच्या दिवशी त्यांच्या मळ्यात कधी शाकाहारी ,कधी मांसाहारी जेवणासाठी आमंत्रीत असायचो .ते दोघेही मुळचे खानदेशातील निवासी असल्याने भाज्या अतिशय तिखट असायच्या. पहिल्याच दिवशी जेवतांना ,पहिल्याच घास घेतला , आणी अतितिखट भाजीमुळे जोराssचा ठसका लागला , इतका की ५ मिनिटे ठसका काही थांबेना .सर्वजण घाबरले . तांब्याभर पाणी पिऊन झाले , गुळाचा मोठा खडा हळुहळू खाऊन झाला . ठसका कमी झाला. नंतर माझ्यासाठी भााजी , फिक्की करून जेवणं झाली.

अन्वी मिर्झापूरला आठवडी बाजार दहीगांव – गावंडेचा बाजार , दर गुरूवारी असायचा . बाजाराची जबाबदारी माझेकडे होती . एकदा मी एकटाच दहिगांव -गावंडेला बाजारासाठी गेलो . बाजारातून निघतांना ऊशीरच झाला . सायकलवरून येतांना रस्त्यातच अंघार झाला . शेतीतून येतांना लागलेली पाऊलवाट चुकली , नी मी शेतातल्या उभ्या पिकात कधी शिरलेा ते कळलेच नाही . मी सायकल हातात घेऊन गावातल्या चक्कीच्या डिझेल इंजिनाच्या आवाजाच्या दिशेने जायला लागलो गांवाच्या बाहेर असलेल्या उकिरड्यावर उतरलो ते दिसलेच नाही , कारण जवळ बँटरी नव्हती ना ! कसातरी घरी पोहोतलो , सर्वजण चिंताक्रांत होऊन काळजी करीत होते .

बोरगांव-मंजू रेल्वे स्टेशन अगदी लहान आहे , तेथे एक्सप्रेस , मेल ,गाड्या थांबत नाहीत , पँसेंजर गाड्या थांबतात .प्लँटफॉर्म नाहीत , अन्वी -मिर्झीपूरला जाणारे रेल्वे-प्रवासी रेल्वे डब्याच्या पायर्या वरून उतरतात . बोरगांव बस स्टेशन पासून रेल्वे स्टेेशन ,४ मैल अंतरावर आहे . पँसेंजर गाडी रात्री ९ वाजता बोरगांवला येते. एकदा मीअकोल्याहून निघालो , गाडीत श्री. बायस्कर गुरूजी भेटले ,१५ मिनिटांत बोरगांव रेल्वे स्टेशन येते , त्यामुळे आम्ही दोघेही दरवाज्याजवळ थांबलो होतो. गाडी फक्त २ मिनिटे थांबते , श्री . बायस्करगुरूजी प्रथम उतरले , मी माझी कपडे असलेले थैली त्यांच्याजवळ दिली , पण मी उतरण्यापूर्वीच गाडी सुरू झाल्याने , नाईलाजाने पुढच्या काटेपूर्णा स्टेशनवर उतरलो . थंडी होती ,जवळ कपडे नाहीत , पैसे नाहीत, परत जायला गाडी नाही.काटेपुर्णा रेल्वे स्टेशनवरून ३ मैलावर कुरणखेड गांव आहे . रस्त्यावर दिवे नाहीत . रात्री २-४ च प्रवासी रेल्वेने येतात .काटेपूर्णा स्टेशन मास्तरांनी मला तिकीट विचारले , मी त्यांना सत्य परिस्थिती सांगीतली . मला स्टेशन मास्तरांनी ,त्यांच्या घरी बरेच पाहुणेआले असल्याने , घरी नेणे शक्य नव्हते . मी ऑफीस बाहेरच रात्रभर थांबलो .सकाळी गांवात पोहेचलो. योगायोगाने कुरणखेड मराठी माध्यमिक शाळेवर माझे अन्वी मिर्झापूरहून बदलीने स्थानांतरण झाल्याचे आदेश आले होते . तेथील मुख्याध्यापकांना मी जावून भेटलो . त्यांचेकडून तात्पुरते उसने पैसे घेऊन मोटार-गाडीने बोरगांव मार्गाने अन्वी मिर्झापूरला पोहोचलो.

मुक्काम घुसर :

माझी शाळेतील सगळया गुरूजनांशी , मुख्याध्यापक श्री .मानकर गुरूजींनी ,ओळख करून दिली. सगळ्यात वृध्द श्री. गोरले गुरूजी होते . अकोला जवळ असलेल्या भौरदचे गावंडे गुरूजी होते . मी एकटाच सर्वात तरूण, कॉलेजमध्ये शिकलेला होतो. इतर सर्वजण १०-१५ वर्ष अनुभवी शिक्षक होते. बहुतेक शिक्षक ७ वी झालेले , आणि नॉर्मल स्कुल मधून शिक्षकाचे ट्रेनिंग घेतलेले , विवाहीत ,मुले, मुली असलेले होते. अकोला पंचायत समिति समितिचे सभापति , श्री. ओंकारराव पागरूत घुसरचेच राहणारे होते. घुसरचेच डॉक्टर पागरूत ह्यांनी शिक्षक पदाचा राजीनामा दिला होता . त्यांच्याच तिसर्या वर्गातील मुलांना, मला शिकवावयाचे होते . आतापर्यंत मी शिकत होतो. ह्यापुढे मला लहान मुलांना गोडीगुलाबीने शिकवावयाचे होते , न चिडता , शक्यतो न मारता . ते जानेवारीतील थंडीचे दिवस होते .
माझ्यासाठी २-४ महिने राहण्यासाठी घराचा शोध सुरू होता .मला शाळेजवळच राहण्यासाठी जागा मिळाली . माझेसोबत श्री . गावंडे गुरूजी राहायला आले . मी वातीचा स्टोव्ह , पोळपाट ,बेलणे , तवा , सराटा ,दोन पातेले , चमचे , पकड , चहागाळणी , दोन कपबशा …इ . आणले होते . मी बनविलेली पहिली पोळी म्हणजे आस्ट्रेलीयाचा नकाशा झाला होता . आतापर्यंत कधीही स्वयंपाक करायचे कामच पडले नव्हते . श्री . गावंडे गुरूजींनी मला हात न लावता पोळपाटावर गोल पोळी कशी लाटावी , ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले . चवीष्ट चहा , भाजीही करायला शिकविले . घुसर हे गांव फार मोठे नव्हते . तेथे पिण्याचे पाणी गावाजवळच्या एकमेव तलावातून आणावे लागायचे . ऊन्हाळ्यात तलाव आटायचा . काही व्यक्ति कावडीने पाणी पुरविण्याचा व्यवसाय करीत .
मी सुटीच्या दिवशी अकोल्याला मामांकडे जायचेा .ति.गं. भा.आजीला ‘ घुसर ‘ हे गांव अकोला येथून ८ मैलावर , खारे-पाणी पट्यात आहे ,पिण्याचे पाणी गावाजवळच्या तलावातून आणावे लागते . २५- ३० वर्षापासून घुसर गांवात फार बदल झालेले नाहीत ,सगळे माहिती होते.
शिक्षकांचे एक दिवसाचे शिबीर जवळच्या आपातापा येथे होते . पोट-शिक्षकांची तेथे सभाही होती . त्या दिवशी आम्ही शिक्षक-शिक्षिका सकाळीच ३ मैल पायी चालतच आपातापा येथे पोहोचलो . मी एकटाच कोट-प्यांटमध्ये होतो .सर्वात तरूणही होतो . आमच्या मुख्याध्यापकांनी माझी सर्वांशी ओळख करून दिली . चहा ,नाश्ता झाल्यावर सगळ्यांनी आपापल्या अडचणी मांडल्या . मार्च-एप्रीलमध्ये घ्यावयाच्या परिक्षेबाबत पंचायत समिती , विभाग- शिक्षणाधिकारी यांचेशी चर्चा , झाली . त्यांनी सविस्तदर मार्गर्शन केले . मध्यंतरात जेवणे झाली.पुन्हा चर्चासत्र सुरू झाले.सायंकाळी कार्यक्रम संपला .दरम्यान मला अस्वस्थ वाटू लागले.कुणाचेतरी डोळे माझा पाठलाग करताहेत असे मला वाटत होते. घुसरला सर्वजण परत आलो. त्या रात्री मी ग्रामपंचायत गोडाऊन मध्ये मलेरिया कर्मचार्यांसोबतच झोपलो. मला खूूप ताप आला. दुसर्या दिवशी मी डॉक्टरांचा सल्ला घेतला ,अतिशय थकवा आला होता.मी तांतडीने मेडशीला जायचे ठरविले. मोटार स्टँडवर मिळेल त्या एस .टी .ने मेडशीला निघालो . त्यावेळी डव्हा येथे श्री. नाथ नंगेमहाराजांची यात्रा सुरू होती.मी मेडशीला रात्री १० वाजता कसाबसा घरी पोहोचलो. ति.सौ.आईने दरवाजा उघडला ,मी आsssईss एवढीच हाक मारली नी घाडकन खाली बेशुध्द होउन पडलो . शुध्दिवर आलो तेच मुळी ३ तासांनी. मेडशीचे डॉक्टर पाठक तोपर्यंत माझ्याजवळच बसून होते .सर्वांना हायसे वाटले. १५ दिवसांनी प्रकृतित सुधारणा झाल्यावर डॉक्टर पाठकांच्या परवानगीने कामावर जायचे ठरविले. डॉक्टरांचे तसे मेडीकल सर्टिफिकेट घेतले. ति.आईच्या मते मला कोणीचीतरी जबरदस्त नजर लागली असावी. डॉकटर पाठकांच्या मते मला ‘व्हायरल फिवर ‘ आला होता.मला आईने विचारणा केली , त्यावेळी मी अगोदरच्या दिवशी आपातापा या गावाला शिबीराला गेल्याची हकिगत सांगितली. त्या रात्रीच मला अचानक अस्वस्थ वाटू लागले, कोणीतरी माझ्याकडे एकसारखे पाहत आहे .पाहणराचे टपोरे डोळे , माझा सतत पाठलाग करित आहेत ,असा भास होत होता हे सांगीतले. हे सगळे ऐकल्यावर आईने माझ्यावरून मीठ – मिरच्या ओवाळून चूलीत विस्तवावर टाकल्या . त्यावेळी कोणालाहि ठसकाss आला नाही,मग मात्र आईची खात्रीच झाली की मला नक्कीच नजर झाली होती. आजारातून बरे झाल्यावर सुमारे १५ दिवसांनी मी वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन पुन: शाळेवर हजर होण्यासाठी मेडशीहून निघालो .

मी घुसरला शाळेवर हजर होण्यासाठी अकोल्याला अकोट स्टँडवर गेलो. तेथून टांग्यात बसून घुसरला निघालो.टांगा बाबू टांगेवाल्याचा होता.जाताजाता गोष्टी सुरू झाल्या,त्यावेळी शाळेच्या गोष्टिही निघाल्या.घुसर गांव तसे चांगलेच आहे.अकोला ह्या ८ मैलावरच्या, जिल्ह्याच्या ठिकाणाशी चांगल्या रस्याने जोडलेले आहे.गांवाला तलावाचे पाणी पिण्यासाठी आणावे लागते . उन्हाळ्यात तलावाचे पाणी कमी होते.तेवढाच त्रास आहे .अकोला पंचायत समितीचे सभापती, श्री. ओंकारराव पागरूत हे घुसरचेच आहेत. गांवात माध्यमिक शाळा ,सातव्या वर्गापर्यंत आहे. हेडमास्तर ,श्री. मानकर खूप अनुभवी आहेत.सगळे मास्तरही अनुभवी आहेत.आता काळानुरूप ३-४ जण नवीनआले आहेत.दोन शिक्षिका आहेत, त्या
अकोल्याच्याच आहेत. नवीन आलेले दोन शिक्षक,तेही तरूणआहेत, अकोल्याचेच आहेत. पण त्यापैकी नवीन आलेल्या श्री. लोणकर गुरूजींना मला भेटायचे आहे. ते १० – १५ दिवस सुटीवर गेलेले आहेत . तसे ते गुरूजी खूप शिकलेले आहेत . सर्व मुला – मुलींना ,गुरूजींना आवडतात. पण माझ्या तिसरीतल्या मुलाला त्यांनी हातावर स्केलने मारले होते,त्याचा अंगठा २ दिवस दुखत होता. मी श्री. बाबू टांगेवाल्याच टांग्यात त्याच्या जवळच बसलो होतो. मी त्याला विचारले ,त्या गुरूजींनी फक्त तुमच्याच मुलाला का बरे मारले असावे ? त्यावर बाबू टांगेवाला म्हणाला,नाही , नाही त्या गुरूजींनी , सर्वच मुलांना १ – १ छडी मारली होती कारटं तस मस्तीखोरच आहे. त्यानच छडी मारायच्यावेळी हात फिरवला आसल ! छडी लागली अंगठयावर. पोरान तस कबूलही केल आहे .माझ्या मनात आता त्याचा राग नाही.

पण मला त्या गुरूजींना भेटीयच आहे,एकदा तरी . तोपर्यंत गांव आलं होत .त्याने मला विचारले, तुम्हाला कोठे जायचे आहे गांवात ? नवीनच दिसता , म्हणून विचारले ! मी म्हणालो मला शाळेत काम आहे. आम्ही सगळे खाली उतरलो. बाबू टांगेवाला म्हणाला चला , मलाही शाळेतच काम आहे , सोबतच जावु . आम्ही दोघेही शाळेत पोहोचलो . ऑफीसात गेलो , सर्वांना नमस्कार केला.
सर्व गुरूजींनी ही माझे स्वागत केले , नमस्कार ! या लोणकर गुरूजी, आता बरं वाटतयना ? आम्हा सर्वांना तुमचीच काळजी वाटत होती .शाळेतील विद्यार्थिही तुमची वाट पहात आहेत . दोन महिन्यातच तुम्ही सगळ्यांना लळा लावला . माझ्या सोबत बाबू टांगेवाला आला आहे हे सगळे विसरूनच गेले होते .

आमच्या शाळेत ऑफीसमध्येच पोस्टऑफीस होते . शाळेचे मुख्याध्यापकच पोस्ट-मास्तरही होते.श्री. मानकर गुरूजींनी बाबू टांगेवाल्याला बसायल सागितले. काय काम काढलं आहे बाबू ? बाबू म्हणाला , ‘ मी लोणकर गुरूजींनाच पाहायला आणि भांडायला आलो होतो. मग त्याने मुलाच्या अंगठ्याला मारामुळे आलेल्या सुजेबद्दल सांगीतले , नवीन आलेल्या गुरूजींनी सर्वांबरोबर मारले म्हणालं पोरगं . त्यांनाच पाहायला व भेटयला आलो होतो . आता समजलं हेच ते नवीन आलेले लोणकर गुरूजी ! अहो हे गुरूजी अकोल्याहून माझ्याच टांग्यात आले ,आमच्या खुप गप्पा रंगल्या ,मलाही हे गुरूजी आवडले ,तुमच्या सर्वांना आवडले तसेच.आता माझ्या मनातला राग केव्हाच गेला. ह्या गुरूजींनी मुद्दाम , दुखापत व्हावी म्हणून मारलं नव्हत. माझ्याच मस्तीखोर कारट्यान हात ओढला म्हणून छडीचा मार अंगठ्यावर लागला . हे मला पटलं आता . मी बाबू टांग्यावाल्याची माफी मागीतली . तो म्हणाला’ तुमची चुकच नाही ! तर माफीची गरज नाही . उलट गांवात तम्हाला कोणताही त्रास झालाच तर मी तुमच्यासोबतच राहीन. पुन्हा भेटूच .
सर्व गुरूजनांना बाबू टांगेवाला पहेलवान माणूस आहे, तो केव्हा बिथरेल नेम नसतो हे माहीती होते. पण आता सर्वांची काळजी मिटली होती . मी डॉकटरांचे सर्टिफिकेट व गैरहजेरीच्या काळासाठी रजेचा अर्ज श्री. मानकर गुरूजींना दिला. परिक्षा जवळ आल्या होत्या. मला परिक्षाप्रमुखाची जबाबदारी सर्वानुमते दिली गेली . श्री . गोरले गुरूजींनी माझी कामाची पध्दति खूपच आवडली .त्यांनी सर्वांसमोरच भविष्यवाणी केली , ” श्री . लोणकर गुरूजी मोठे साहेब होतील .” मी दर आठवडयाला अकोल्याला मामाकडे जायचो त्यावेळी श्रीमती मोहरीलबाई सोबत असायच्या ,त्यांचा लहान भाऊ माझ्यासोबत इयत्ता ९-१० -११ ला शाळेत शिकत होता . तो भुमितीत फार हुषार होता.१० वीत असतांनाच ११ वीची भुमितीची प्रमेय स्वत:च तयार करून सरांना दाखवायचा . श्रीमती मोहरीलबाई जुन्या शहरातच साधुबुवाच्या मठजवळच राहायच्या . त्यांच्या घराजवळच पुढे दाबकी रोडवर ति. मामांचे घर होते . श्रीमती करमरकरबाईही अकोल्याच्याच ,रतनलाल प्लॉटमध्ये राहायच्या. त्यांचे वडील अकोल्यालाच नगरपालीका शाळा क्रमांक १ मध्ये प्राथमिक शिक्षक होते . वर्ग पहिली ते सातवी च्या परिक्षा वेळापत्रकाप्रमाणे , पार पडल्या . इयत्ता चौथी आणि सातवीच्या सार्वत्रीक परिक्षाही पार पडल्या.

घुसरला मधून मधून सप्रे बंधू नाटक कंपनी येत असे. ह्या कुरणखेडच्या कंपनीने निरनिराळी मराठी नाटके बसविलेली होती. काम करणारे सगळे नट , नट्या एकाच कुटुंबातील होते. त्यावेळी नाटक बंद स्टेजवर असे. स्टेजच्या समोर मोठ्ठ्या चौकोनी खड्यात गांवातील प्रतिष्ठीत व्यक्तिंना आमंत्रित करून बसविले जाई. गांवातील आणि आजूबाजूच्या गांवातील प्रेक्षकवर्ग आपापली सतरंजी घेवून बसत असत. नाटकाच्या जागेभोवती कपड्याचे पडदे लावलेले असायचे. त्यावेळी प्रसिध्द झलेली त्यांच्या नाटकापैकी ‘भांडखोर बायको ‘ हे गमतीदार नाटक सर्वांना खूप आवडायचे. साध्यासाध्या संवादातील मजेदार व निख्खळ विनोदामुळे सर्व प्रेक्षकवर्ग खळखळून हसत असे .” घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाssणा !, आयुष्याचा नाश होतो, राम तरी म्हणाना ” हे पद माझ्या
आजही स्मरणांत आहे. ‘जाssरे भटजीला घेऊन ‘ये ‘ अर्घवट ऐकून मुलगा जाऊन ‘भटजी ‘ ऐवजी ‘ ट ‘गाळून बाजूच्या हॉटेलमधून १ किलो ‘ भजी ‘घेऊन येतो.हे काय ? मुलगा विचारतो ,पुरतील ना !, तळलेल्या मिरच्या वेगळ्या आणल्या आहेत !, गावात किर्तन करणारे बुवा महाराज एका मुलाला बाजूच्या दुकानातून ‘ ‘ खडीसाखर ‘आणयला पाठवितात . तोपर्यंत बुवा महाराजांचा ‘ अभंग ‘ संपलेला असतो . ‘ तssर तुकाराम महाराज काय म्हणतात ? ‘ तेवढेयात परत आलेला मुलगा येऊन मोठ्या आवाजात सांगतेा ,” खडीसाखर नाही ! संपली म्हणतात ”

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या नी ”अप्रशिक्षित शिक्षक जादा शिक्षकांना ” मे आणि जुन २ महिन्यासाठी अकोला जिल्हा शिक्षणाधिकार्यांच्या आदेशाप्रमाणे कमी करण्यात आले . मला सर्व शिक्षकांनी एका छोट्या समारंभानंतर निरोप दिला. मी सर्व गुरूजनांचे व गांवकर्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. विशेषत:बाबू टांगेवाल्याने मला अकोल्याला मामाच्या घरी रोहोचविले. मी घुसरच्या वयोवृध्द श्री.गोरले गुरजींची ”तुम्ही मोठे वर्ग १ अधिकारी होणार ”ही ,’भविष्यवाणी ‘ सदोदित लक्षात ठेवली. भौरदच्या श्री. गावंडे गुरुजींनी हातही न लावता गोल पोळ्या कशा लाटायच्या ह्याचे तंत्र शिकविले . त्या अगोदर माझ्या पोळ्या श्रीलंकेचा – आस्ट्रेलीयाच्या नकाशाच्या प्रतिकृतीच असायच्या . श्री .दोळ गुरूजींकडून थोडी नाट्यकला शिकलो . इतर सहकार्यांकडून प्रेमाची देवाण घेवाण आणि मनाची शांतता ठेवणे ….इ. , शिकण्याचा प्रयत्न करणे शिकलो .माझ्या भावी नोकरीच्या काळात मला ह्या सगळ्यांचा खूप उपयोग झाला.

पुढे काय!?

मी लहान ५ -६ वर्षाचा असतांना ति. मोठेमामा भोनला आले होते. त्यावेळी घरची आर्थिक परीस्थिती हलाकीची होती. तसेच गांवात फक्त चौथीपर्यंतच शाळा होती. ह्या सगळ्या परिस्थितिचा विचार करून ति.मोठेमामांनी , आई-बाबांना वचन दिले. !
” मी तुमच्या मुलाला अकोल्याला शिकायला घेउन जातेा , मॅट्रिकपर्यंत माझ्याच जवळ ठेवतो, सगळा खर्च करीन. तुम्ही दोघेही मधूनमधून भेटायला येत जा. तोपर्यंत तुमची परिस्थितिही सुधारेल.” त्यानंतर संधी मिळताच त्यांनी ति.बाबांनाही मेडशीला शाळेत सरकारी नोकरीत लावून दिले. माझ्या शिक्षणात खंड पडला नाही. मामांकडेच राहिलो, अकरावी मॅट्रीक झाल्यावर पुढे काॅलेजमध्ये दोन वर्षे शिकलो. गांवापेक्षा मेडशीला नोकरीला असल्याने आर्थिक परिस्थितिही सुधारली होती. ह्या सगळ्या बाबींचा साकल्याने विचार केला , आई-बाबांशीही विचार- विनिमय केला.ति. मोठेमामांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेतला.
“आता स्वत:च्या बळावर नोकरी करून पुढील शिक्षण घेत राहायच, प्रगति करायची , स्वत:बरोबर भावंडांचेही शिक्षण , विवाह….इ.च्या प्रगतीसाठी प्रयत्न करायचे”
त्याच दरम्यान जिल्हा परिषद, अकोला ,ची ‘अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक’ पदांसाठी जाहिरात आली होती .ति.मोठेमामा पश्चिम वर्हाड विभागात , सुपरिन्टेडेटचे ,स्वीय सहाय्यक ,होते .त्यावेळी त्यांना सर्व शाळांच्या तपासणीसाठी जावे लागायचे .त्यामुळे गावोगावच्या प्राथमिक शिक्षकांना ,त्या गावच्या पुढार्यांकडून मिळणार्या , हरकाम्या व्यक्तिसारखी अपमानास्पद ,वागणूक दिली जाते , ह्याची कल्पना होती .गुरूजींना मिळणारी आदराची वागणूक दिली जात नाही. ह्याची जाणीव असल्याने , शिक्षकाच्या नोकरीस पसंती नव्हती . परंतू सर्वच गावात ,सरसकटपणे अशी वागणूक दिली जात नाही , हेही मान्य होते. त्यामुळे त्यांच्या संमतिनंतरच , मी अप्रशिक्षीत प्राथमिक शिक्षकाच्या जागेसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला . त्याकाळी सरळ निवड व्हायची .माझा नेमणुकीचा आदेश मेडशीच्या पत्यावर गेला .ति. रा.रा.बाबा तेा आदेश घेऊन अकोल्याला आले. अर्ज केल्यापासून चार महिन्यानंतर नेमणुकीचे आदेश निघाले होते.
मला ‘घुसर ‘ पंचायत समिती, अकोला, येथे जिल्हा परिषद मराठी माध्यमिक शाळेवर ‘जादा शिक्षक’ या पदावर नेमणूक , शिक्षणाधिकारी जि. प. अकोला ,यांच्या लेखी आदेशाप्रमाणे देण्यात आली. ‘ घुसर ‘ हे गाव अकोला येथून ८ मैलावर होते . अकोला रेल्वे स्टेशनच्या पलीकडे आपातापा रोडवर घुसर हे गांव होते . सदर रस्ता कच्चा होता , रस्त्यात दोन तीन खोल नाले होते . पलिकडल्या वा अलीकडल्या काठावरच्या कोणालाही नाल्यातला माणूस दिसत नसे . मी एकटाच सायकलने घुसरला निघालो . सुटीचा दिवस तसेच दुपार असल्याने रस्त्याने क्वचितच माणसे दिसत . गावांत पोहोचलो ,तो समोरच शाळा दिसली . त्याचवेळी मी समोरच्या व्यक्तिकडे मुख्याध्यापक श्री . मानकरगुरूजींची चौकशी केली .योगायोगाने मी ज्यांना विचारले तेच मुख्याध्यापक श्री . मानकरगुरूजी होते .त्यांना मी माझ्या ‘ जादा शिक्षक ‘ म्हणून घुसरला नेमणूक झाल्याचे सांगीतले . त्यांनी मला उद्या शनिवारी दि .२८/ १२/१९६३ रोजी सकाळी शाळेवर रूजूं होण्यासाठी होण्यासाठी येण्याचा सल्ला दिला . घरी परत आल्यावर मी घरी घुसरला जाऊन आल्याचे सांगीतले . ति .गं .भा .आजीच्या जुन्या आठवणीप्रमाणे घुसर हे खूप खार्या पाण्याचे गांव आहे . तेथे फक्त एकच तलाव आहे .सदर तलाव उन्हाळ्ळयात आटतो .

त्यावेळी अकोला येथे जिल्हा ऑलींपिकचे खेळ सुरू हेाते . मी दुसर्याच दिवशी, दिनांक २८ डिसेंबर १९६३ हया दिवशी घुसरला शाळेत कामावर रूजूं होण्यासाठी निघालो . जातांना मला डाबकी रोडवरचे माझ्या ओळखीचे पोस्टाचे सुपरवायझर भेटले .त्यांनाही पोस्ट तपासायला घुसरलाच जायते होते . ते वृद्ध असून पुढच्या सहा महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते .आम्हा दोघांनाही घुसरला जाण्यासाठी एकमेकाची सोबत होणार होती . पोस्टाचा चार्ज शाळेच्या मुख्याध्यापकांकडेच होता . ते मला म्हणाले मी तुमच्या मुख्याध्यापकांना तुम्ही माझ्या सोबत आल्याने उशीर झाला असे सांगीन . आम्ही दोघेही घुसरला सकाळी ८.३० ला पोहोचलो . तेथे पोहोचल्यावर ते पोस्टाचे सुपरवायझर काहीच बोलले नाहीत .तेथे सिनिअर ग्रामसेवक श्री ,टापरेसाहेब बसलेले होते . त्यांनी माझा नेमणुकीचा आदेश पाहताच मुख्याध्यापकांना श्री . लोणकर गुरूजींची नेमणूक कोणात्या गुरूजींच्या जागेवर झाली आहे ,ह्यचाा खुलासा होत नाही. आपल्या शाळेतील श्री . पागरूत डॉक्टर गुरूजींनी राजीनामा दिला आहे . पण श्री .लोणकर गुरूजींची नेमणूक ‘जादा शिक्षक’ पदावर झाली आहे .त्यांना श्री .पागरूत गुरूजींच्या जागी कसे रूजू करून घेणार ? आपण जादा शिक्षकाची मागणीही केली नाही . तुम्ही आता ह्यांना शाळेत कामावर कसे काय रूजू करून घेणार ? पंचायत समितिच्या साहेबांकडून ह्यांना स्पष्ट खुलासा करून , घेऊन येण्यास सांगावे अले मला वाटते . आता ‘जादा शिक्षक ‘ शब्दाचा अर्थ लक्षात न आल्याने ,मला मुख्याध्यापकांनी , कामावर रूजू करून घेण्यास नकार दिला . तसेच मला श्री .टापरेंनी सुचविल्याप्रमाणे शिक्षणाधिकारी कडून योग्य तो खुलासा करून , घेऊन आल्यावरच मी तुम्हाला रूजू करून घेईन . मला आता काय करावे ? सुचले नाही.दुसरे दिवशी रविवार असल्याने पंचायत समिती /जिल्हा परिषद कार्यालयही बंद असणार होते . लगेचच्या कामाच्या दिवशी मी ,”मुख्याध्यापक, म. मा.शाळा , घुसर,पं .स.अकोला , ह्यांनी , मला कामावर रूजू करून घेण्यास , नकार दिला . हा आपल्या आदेशाचा ‘ अवमान ‘ करण्यात आला आहे , तरी आता योग्य तो आदेश तांतडीने देण्याची कृपा करावी ” , असा विनंतीवजा, तक्रार अर्ज, शिक्षणाधिकारी , जि. प. अकोला यांचेकडे घेऊन गेलो .

त्या दिवशी उप- शिक्षणाधिकारी, श्री. पुराणिकसाहेबांचे कार्यालयात सकाळी कार्यालय सुरू होण्याची वेळ होती .त्याचवेळी सहाय्यक उपशिक्षणाधिकारी, श्री. आमलेसाहेबांना , तांतडीचा फोनआला.” श्री. पुराणिकसाहेबांना Heart Attack आला आहे ,ताबडतोब या. माझा अर्ज वाचून ”श्री.आमलेसाहेबांनी ,पत्र लिहून ,त्या पत्रावर स्वाक्षरी केली , पाकीट बंद करून मला घुसरच्या मुख्याध्यापकांचा पत्ता लिहायला सांगून ते पाकीट त्यांना त्वरीत नेवून द्यायला सांगितले , नी स्वत: पुराणिक साहेबांच्या घरी तांतडीने गेले.
मी ते बंद पाकीट त्याच दिवशी , श्री.मानकर, मुख्याध्यापक , मराठी माध्यमिक शाळा , घुसर . ह्यांना नेवून दिले . त्यांनी ते पत्र वाचताच ,त्यांचा चेहरा पडला ,थरथरत्या हातांनी ,शिक्षकांचा हजेरीपट काढून माझेजवळ दिला . पत्रातील आदेशाप्रमाणे मला दिनांक २८डिसेंबर १९६३ रोजी रूजू झाल्याची सही ,हजेरीपटात करायला सांगितली .थोड्या वेळाने पाणी पिऊन झाल्यावर ,” तुम्हाला रुजू करून न घेता परत पाठविले , ही माझी मोठी चुकच झाली .”असे कबूल केले . त्यानंतर तसे स्पष्टिकरण करणाऱे पत्र (१ ) शिक्षणाधिकारी, जि. प. अकोला ,आणि (२) संवर्ग विकासअधिकारी ,पंचायत समिती ,अकोला, ह्यांना उलट टपाली पाठविले .